निधी बंद केल्याने सोलापूर जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या योजना बारगळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:41 PM2019-02-09T16:41:35+5:302019-02-09T16:44:55+5:30
सोलापूर : मागील साडेचार वर्षांत भाजपप्रणीत केंद्र शासनाने जिल्हास्तरीय नेहरू युवा केंद्रास निधी देणे बंद केले आहे. पाच वर्षांपूर्वी ...
सोलापूर : मागील साडेचार वर्षांत भाजपप्रणीत केंद्र शासनाने जिल्हास्तरीय नेहरू युवा केंद्रास निधी देणे बंद केले आहे. पाच वर्षांपूर्वी दरवर्षी या केंद्राला एक ते दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येत होता. मागील साडेचार वर्षांत या विभागाला केवळ वार्षिक पाच लाखांचाच निधी देण्यात येत असल्याने या विभागाच्या योजना बारगळल्या गेल्या आहेत.
ग्रामीण भागातील सामाजिक कार्यास प्रेरणा मिळावी, सामाजिक विषयावर चर्चासत्र व कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, यासाठी जिल्हास्तरीय नेहरू युवा केंद्राच्या नियंत्रणाखाली प्रत्येक गावात एक नेहरू युवक मंडळ व युवती मंडळ स्थापन करण्यात आले होते. या मंडळांना सामाजिक कार्यासाठी पाच वर्षांपूर्वी नेहरू युवा केंद्राकडून निधी देण्यात येत होता. या निधीतून मुली वाचवा, वृक्षारोपण, व्यायामशाळा, वाचनालय, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नेहरू युवा मंडळाच्या वतीने करण्यात येत होते. मात्र या उपक्रमांसाठी कोणताही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील युवा मंडळांचे कामही थंडावले गेले आहे.
नेहरू युवा केंद्राच्या नावामुळेच केंद्र शासनाकडून सध्या निधी मिळत नसल्याची ओरड युवक मंडळाकडून होत आहे. ग्रामीण भागातील सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांसाठी नेहरू युवा मंडळाच्या उपक्रमांना या विभागाकडून अर्थसाह्य करण्यात यावे, अशी मागणी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नेहरू युवा केंद्राला निधी मिळवून दिला होता. सामाजिक कार्यासाठी नियोजन समितीमधूनही निधी मिळावा, अशी अपेक्षा युवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या नेहरू युवा केंद्रात केवळ दोन कर्मचारी दिसून येत आहेत. निधीअभावी योजना नाहीत अन् योजनेअभावी काम नाही, अशीच गत या कर्मचाºयांची झाली आहे. तालुकास्तरावरही दोन कर्मचारी केंद्रात कार्यरत असून, त्यांचेही काम सध्या केवळ वेळ मारून नेण्याचेच असल्याचे दिसून येते. क्रीडा व अन्य उपक्रमात कें द्र शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नाममात्र सहभागी होण्याचे काम या केंद्रातील कर्मचाºयांकडून होत आहे.