गाय, बैलांचा बाजार बंद, आंतरजिल्हा वाहतूकीवरही निर्बंध; लम्पी आजार वाढत असल्याने सीईओंचा निर्णय
By शीतलकुमार कांबळे | Published: August 22, 2023 04:41 PM2023-08-22T16:41:59+5:302023-08-22T16:43:13+5:30
सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत जनावरांमध्ये 60 टक्के ही वासरे आहेत.
सोलापूर - जिल्ह्यामध्ये लम्पी आजाराने बाधित असणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. याचा विचार करून सोलापूर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. तसेच आंतरराज्य व अंतर जिल्हा होणारी जनावरांची वाहतूक वर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत जनावरांमध्ये 60 टक्के ही वासरे आहेत. जिल्ह्यात माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर येथे या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे. त्यामुळे गोठा साफ ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे, जनावरांचे लसीकरण करणे या पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धतीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनानुसार काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी जिल्ह्यामध्ये होणारे जनावरांच्या बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्य व अंतर जिल्हा होणारी जनावरांची वाहतुकीवर ही बंदी घालण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा परिषद आपल्या परीने सर्व काळजी घेत आहेत. शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी व पशुवैद्यकीय विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन वेळोवेळी करावे असे आवाहन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.
या जनावरांच्या बाजाराला परवानगी
लम्पीचा प्रादुर्भाव हा गाय बैल व त्यांची वासरे यांना अधिक होत आहे. म्हैस, शेळी, मेंढी यांना या आजाराचा त्रास होत नाही. त्यामुळे फक्त गाय वर्गीय जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेळी, मेंढी, म्हैस यांचे बाजार सुरूच राहतील असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.