मेघगर्जनेसह कोसळल्या सरींवर सरी; सोलापूरकरांनी अनुभवला सुखद गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:41 PM2019-06-04T12:41:40+5:302019-06-04T12:43:23+5:30
सकाळपासून सोलापूर शहरात ढगाळ वातावरण; आजही पाऊस येण्याची शक्यता
सोलापूर : गेल्या दीड महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणारं ऊन अन् उकाड्यामुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना मेघगर्जनेसह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी दिलासा दिला. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या बरसातीमुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. शहरातील सखल भागात पाणी - पाणी झाले. रात्री ११.३० वाजेपर्यंत २०.४ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
उन्हाळ्यातील रोजच्या दिवसाप्रमाणेच सोमवारचा दिवस होता. सकाळी नऊ वाजल्यापासून कडक उन पडले होते. दुपारी कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी तीननंतर बदललेले वातावरण पाहता पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. १० मिनिटातच पाऊस थांबल्याने गारव्याऐवजी उकाड्यात वाढ झाली. तापलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडल्याने जमिनीतील धग बाहेर पडली होती. यामुळे उकाड्याचा जास्त त्रास होत होता; मात्र रात्री ८.१५ वाजता पावसाने पुन्हा मनावर घेतले अन् सरी कोसळायला सुरूवात झाली. विजेचा लखलखाटही होता.
पाऊस पडल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. पत्रकार भवन, दत्त नगर, लष्कर आदी परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. गावठाण भागात शिंदे चौक, छत्रपती शिवाजी चौक, मेकॅनिकी चौक, जुना एम्पलॉयमेंट चौक शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्तीसाठी खोदण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावरुन जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. ऐनवेळी आलेल्या पावसाच्या हजेरीने पादचारी तसेच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली होती.
दोन जूून रोजी ४१ अंश सेल्सिअस तापमानाचा अपवाद वगळता मागील आठवड्यापासून सोमवारपर्यंत सोलापूरचा पारा हा ४३ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होता. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. यामुळे तापमानातही घट झाली. सात जूनपर्यंत सोलापुरातील हवामान काहीसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हलका पाऊसही पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर आठ व नऊ जून रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे.
विजेची तार तुटून गायीचा मृत्यू...
- सत्तर फूट रोडवरील दुस्सा बिल्डिंगजवळ तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून फिरत्या गायीचा मृत्यू झाला. वादळ वाºयामुळे रात्री ८.३० वाजता या भागातील विजेची तार तुटून जमिनीवर पडली होती. फिरत्या गायीचा पाय विजेच्या तारेवर पडल्याने ती जागीच मरून पडली. अग्निशामक दलास पाचारण करण्यात आल्यानंतर जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन विजेचा पुरवठा बंद केला. गायीला बाजूला काढून आरोग्य विभागास माहिती देण्यात आली. गायीमुळे हा प्रकार लक्षात आला, अन्यथा कितीतरी लोकांचा जीव गेला असता? अशी चर्चा परिसरात रंगली होती.
कसबा परिसरात घर पडले...
- रात्री झालेल्या पावसामुळे कसबा चौक, पंजाब तालीमच्या शेजारी असलेल्या मल्लिनाथ भास्कर यांचे घर पडले. रात्री १० वाजता हा प्रकार घडला. घर पडल्याने आतमध्ये कुटुंबातील पाच लोक अडकून पडले होते. अग्निशामक दलास पाचारण करण्यात आल्यानंतर जवानांनी तत्काळ पत्रे व भिंतीच्या विटा बाजूला करीत गिरीजाबाई बाळू भास्कर (वय ८०), सुवर्णा धोंडिबा भास्कर (वय २८), वैशाली प्रभाकर भास्कर (वय ३०), अभिषेक प्रभाकर भास्कर (वय १९), समर्थ धोंडिबा भास्कर (वय १२) या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.