उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी उचलण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:04+5:302021-04-25T04:22:04+5:30
भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील ...
भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिचंन व निरा डावा कालव्यावरील २२ गावांतील शेतीसाठी पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी दिली आहे. इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे उजनी धरणावरचा ताण वाढणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनाखाली मंत्री भरणे यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. या प्रस्तावावर २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली असून, जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खडकवासला कालव्यावरील शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात शेतीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. याशिवाय निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. इंदापूर विधानसभेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत २२ गावांचा पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी मंत्री भरणे यांचा पाठपुरावा चालू होता. वारंवार या योजनेवरून भरणे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले होते.
----
खडकवासला कालव्यात टाकणार पाणी
कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एच.पी. क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी १० कि.मी. अंतरावर शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडसिंगेपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातून नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यांवरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.