खारघर उष्माघात प्रकरणी शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे यांची मागणी
By राकेश कदम | Published: April 24, 2023 05:33 PM2023-04-24T17:33:51+5:302023-04-24T17:34:40+5:30
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा
राकेश कदम, सोलापूर: खारघर उष्माघात दुर्घटनेची सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
आमदार शिंदे म्हणाल्या, खारघर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. हा सोहळा भाजप आणि शिंदे सरकारने आयोजित केला होता. या सोहळ्याचे कोणत्याही प्रकारे व्यवस्थित नियोजन झाले नव्हते. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली. सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. विधीमंडळाचे अधिवेशन बोलवायला हवे.
सावरकरांबद्दल आदर कमी झाला
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मला आदर होता. काही दिवसांपूर्वी मी त्यांचे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचले. या पुस्तकात छत्रपती शिवरायांबद्दल अविचारी लेखन आहे. महिलांबद्दल अनुद्गार आहेत. त्यामुळे माझा आदरणीय सावरकरांबद्दलचा आदर कमी झाला, असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"