चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान
By Appasaheb.patil | Published: July 17, 2024 10:11 AM2024-07-17T10:11:41+5:302024-07-17T10:12:03+5:30
पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली.
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. या तिन्ही वर्षातील पूजेवेळी शिंदे कुटुंबातील चार पिढ्यातील सदस्यांचाही महापूजेवेळी समावेश होता.
दरम्यान, पाहिली पिढी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, दुसरी पिढी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तिसरी पिढी म्हणजेच त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे अन् चौथी पिढी म्हणजेच श्रीकांत शिंदे यांचा मुलगा रुद्रांश.
आज आषाढी एकादशीचा सोहळा. पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली. महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले. यावेळी माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता, मुलगा डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश उपस्थित होते. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील भाग्याचा अन् आनंदाचा दिवस आहे. पांडुरंगाच्या व राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबातील चार पिढ्यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला. सध्या पंढरपुरातील चारही दिशेला विठ्ठलाच्या नामाचा जयघोष होतोय. पंढरपुरातील वातावरण भक्तीने झालं असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.