कल्याणराव काळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; माढ्यात उघडपणे करणार युतीचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:44 AM2019-03-30T10:44:55+5:302019-03-30T10:47:39+5:30
प्रवेशाचा पक्ष मात्र गुलदस्त्यात : भाजप की शिवसेना याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत करण्याची तयारी दाखविली आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाची स्थिती पाहता भाजपमध्ये प्रवेश करायचा की शिवसेनेत याचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपविला आहे.
भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. कल्याणराव काळे हे भाळवणी (ता. पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पंढरपूर, सांगोला, माढा विधानसभा मतदारसंघात काळे गटाचा प्रभाव आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे काळे यांचे राजकीय गॉडफादर मानले जातात. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मात्र आम्हाला विश्वास दिल्यास आमच्या भागातील विकासकामे मार्गी लावल्यास आम्ही भाजपला मदत करायला तयार आहोत. पण तत्पूर्वी मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेईन, असे काळे यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले.
माढा विधानसभेच्या जागेमुळे पक्ष प्रवेशाचा तिढा
कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. माढ्याची जागा ही शिवसेनेकडे आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती कायम राहण्याची शक्यता आहे. कल्याणराव काळे यांनी पुन्हा माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यास पुन्हा अडचण होण्याची शक्यता आहे. या विषयावर कल्याणराव काळे शनिवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.
राजकारण करताना संस्थाही कारभार चांगल्या पध्दतीने चालविणे आणि आपल्यासोबत सरकार असणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपात प्रवेश करायचा की माढा लोकसभा निवडणुकीत केवळ पाठिंबा द्यायचा याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच घेणार आहे.
- कल्याणराव काळे