धावत्या टेम्पोतून सीएनजी गॅसची गळती; आकाशात वायूच्या लोटानं घबराट
By विलास जळकोटकर | Published: September 16, 2023 05:24 PM2023-09-16T17:24:12+5:302023-09-16T17:24:47+5:30
शेळगी गावापासून जवळ असलेल्या रघोजी ट्रान्स्पोर्टजवळील हायवेवर सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
सोलापूर : सर्वच वाहनांसाठी वापरात असणारा सीएनजी गॅस वाहून नेणाऱ्या टेम्पोतील टाक्या लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाली अन् धावत्या टेम्पोमधून गॅसच्या वायूचे लोट आकाशात पसरले. शेळगी गावापासून जवळ असलेल्या रघोजी ट्रान्स्पोर्टजवळील हायवेवर सायंकाळी ही घटना उघडकीस आली. चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थांबवलं. लागलीच अग्निशामक दलाचा बंद दाखल झाला अन् हैद्राबाद रोडकडे वाहन नेऊन गळती बंद करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एमएच १३, डीक्यू ६५३१ या आयशर टेम्पोमधून चिंचोळी एमआयडीसी येथून सीएनजी गॅस भरलेल्या ६० टाक्या भरून चालक भीमाशंकर सुसळे हा सायंकाळी द. सोलापूर तालुक्यातील सुरेश पेट्रोलियम येथे सुपूर्द करण्यासाठी निघाला होता. हे वाहन रूपाभवानी मंदिर रोड पास करून पुढे जाताना रघोजी ट्रान्स्पोर्टजवळ वाहनातील टाकीचा व्हॉल्व्हमधून गळती होऊ लागल्याने गॅसचा वायू लोट आकाशात पसरू लागले. हे पाहून सर्व्हिस रोडवरून धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांमधून घबराट पसरली. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने चालक शिवशंकर सुसळे यांनी वाहन थांबविले. उतरून पाहता हा प्रकार पाहून तेही घाबरले. उपस्थितांपैकी एकाने तातडीने अग्निशामक दलास कल्पना दिली.
लागलीच पथक दाखल झाले. हे पाहून चालकाच्याही जिवात जीव आला. दरम्यान, सीएनजी गॅसचे प्रोजेक्ट इंजिनिअर गणेश यादवही दाखल झाले. रहदारीच्या ठिकाणी होणाऱ्या गळती बंद करण्यासाठी त्यांनी हे वाहन खानचाचा हॉटेलच्या पुढील रोडवर नेले. पाहणी करताना व्हॉल्व्ह लिकेज झाल्याचे गळती होत असल्याचे लक्षात आले. अग्निशामक दलाच्या तत्परतेने व्हॉल्व्ह बंद करण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.
तर मोठी दुर्घटना घडली असती
दोड्डी येथे सुरेश पेट्रोलियमकडे सीएनजी गॅसच्या टाक्या खाली करायच्या होत्या. या वाहनामध्ये एकूण ६० टाक्या होत्या. त्या एकमेकाला कनेक्ट होत्या. यापैकी किमान दोन टाक्यांमधील गॅस हवेत पसरल्याची शक्यता अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाचा बंब वेळीच दाखल झाला अन्यथा मोठी दुर्घटना ओढावली असती, असे मत प्रत्यक्षदर्शींसह फायरमॅन यांनी सांगितले.