सहकारमंत्र्याच्या सोलापूर जिल्ह्यातील सहकार खात्यात अधिकाºयांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:17 PM2018-06-11T15:17:23+5:302018-06-11T15:17:23+5:30
बँक असोसिएशनही प्रभारीवर, सहायक निबंधकाच्या आठ पदांसह ६२ पदे रिक्त
सोलापूर: राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सहकार कार्यालयात कर्मचाºयांच्या प्रमुख अधिकाºयांच्या जागा रिक्त असल्याने प्रभारी अधिकारी बदलण्याचे काम सुरू आहे. १८६ पैकी ६२ कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे मे महिन्यात पंढरपूर व करमाळ्याच्या सहायक निबंधकांची बदली झाली; मात्र त्यांच्या जागेवर कोणी अधिकारी दिलेला नाही.
सोलापूर जिल्ह्यात सध्या सहकार खात्यात चौकशी व कारवाईचा धडाका सुरू आहे. याच जिल्ह्यात मात्र अधिकारी व कर्मचाºयांची वानवा आहे. जिल्हा उपनिबंधक दर्जाचे एक पद असून ते कार्यरत आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सहायक निबंधक दर्जाची तीन पदे असून पैकी एक कार्यरत आहे.
दोन पदे रिक्त आहेत. असाच प्रकार सहकार खात्याच्या कार्यालयात आहे. सहायक निबंधक दर्जाची ७ पदे रिक्त आहेत. अक्कलकोट सहायक निबंधकाचा पदभार सहकार अधिकारी दत्ता मोरे यांच्याकडे आहे. उत्तरचा पदभार मोहोळच्या जिजाबा गावडे, मंगळवेढ्याच्या सहायक निबंधकाचा पदभार सांगोल्याच्या मोहन शिंदे यांच्याकडे पंढरपूरचा पदभार माळशिरसच्या देविदास मिसाळ यांच्याकडे, करमाळ्याचा पदभार माढ्याच्या सुनील गावडे यांच्याकडे पदभार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दोन सहायक निबंधकाची पदे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी व अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा) चे सहायक निबंधकाचे पद रिक्त आहे. पंढरपूर व करमाळ्याच्या सहायक निबंधकाच्या नुकत्याच भोर व आंबेगाव येथे बदल्या झाल्या; मात्र त्या जागी कोणी अधिकारी आला नाही.
वर्ग-३ ची जिल्हाभरातील कार्यालयात १३६ पदे मंजूर असून पैकी ९८ कर्मचारी कार्यरत तर ३८ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ च्या मंजूर ३३ पदांपैकी १७ कार्यरत तर १६ पदे रिक्त आहेत. विशेष लेखा परीक्षकाची सहा पदे असून पैकी जिल्हा बँकेसाठीचे एक व वर्ग-२ चे एक पद रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
३४ नागरी बँका अन् असोसिएशन..
- सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी नागरी बँक सक्षमपणे सुरू आहे. याशिवाय अन्य तालुक्यातील व शहरात मुख्यालय असलेल्या नागरी बँकांच्या तालुका पातळीवरच्या शहरात शाखा आहेत. जिल्हाभरातील ३४ नागरी बँकांच्या थकबाकीदारांच्या १०१ प्रकरणाचे दावे चालविणारे बँक असोसिएशनचे उपनिबंधक दर्जाचे पद बापूसाहेब कटरे यांच्या बदलीनंतर रिक्त आहे. कटरे यांच्या बदलीनंतर सहायक निबंधक प्रकाश नालवार यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला होता. त्यांच्याकडून पंढरीनाथ घुगे व सध्या दक्षिणचे सहायक निबंधक बालाजी वाघमारे यांच्याकडे पदभार आहे.
उत्तर तालुक्याचे हाल कायम...
- उत्तर तालुक्याला मागील काही वर्षांपासून सक्षम अधिकारीच मिळाला नाही. के.सी. सप्ताळे यांच्या कालावधीत कार्यालयाचा कारभार रामभरोसे होता. त्यानंतर वैशाली साळवे यांनी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न केला मात्र चौकशांच्या गोंधळामुळे त्यांनी पदभार सोडला. त्यानंतर प्रभारी अधिकारी अरुण सातपुते व आता मोहोळचे सहायक निबंधक जिजाबा गावडे यांच्याकडे प्रभारी पदभार आहे.