सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:49 PM2018-02-20T12:49:08+5:302018-02-20T12:52:59+5:30
शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी माळकवठे येथे बोलताना व्यक्त केली.
माळकवठे येथील सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत शेतकºयांना २० ट्रॅक्टर, २० कृषी पंप, २० पीव्हीसी पाईप संच, भाजी-पाल्यासाठी ५०० कॅरेटस्चे वितरण सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. माळकवठे विकास सोसायटीच्या वतीने ठेवी स्वीकारण्याचा शुभारंभ तसेच सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू असून १०१ मे.टन पोत्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील होत्या. व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे संचालक विजयकुमार बरबडे, उपसभापती संदीप टेळे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे, प्रभावती पाटील, पं. स. सदस्य महादेव कमळे, शशीकांत दुपारगुडे, रेखा नवगिरे, सोनाली कडते यांची उपस्थिती होती.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हणमंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, कंपनीच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, येत्या वर्षभरात राज्यातील पाच हजार विकास सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. अनुदानातून नाही तर शेतकºयांच्या योगदानातून सहकारी संस्थांचा आणि गावांचा विकास होऊ शकतो. तालुक्यात गेल्या ७० वर्षांत अवघे १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ६७ टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे. वाळू वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली तरीही विरोधकांना या तालुक्यासाठी काही करावेसे वाटले नाही. समाजाला अज्ञानात ठेवण्यातच धन्यता मानणाºयांनी स्वार्थी राजकारणापलीकडे पाहिलेच नाही, असा टोला त्यांनी लगावला.
या कार्यक्रमास हंजगीचे आरकेरी महाराज, डॉ. चनगोंडा हविनाळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, टाकळीच्या सरपंच सुशीला ख्यामगोंडे, शिरीष पाटील, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मायप्पा व्हनमाने, शरीफ शेख, मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, मद्रेच्या सरपंच विजयालक्ष्मी होनमाने, यतीन शहा, तांदुळवाडीचे सरपंच सिद्धाराम हेले, तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे, सहायक निबंधक बालाजी वाघमारे, प्राचार्य विश्रांत गायकवाड, सचिन पाटील, माळकवठेचे सरपंच शिवलिंग बगले, उपसरपंच शकिला शेख, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार साळुंके यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------
लोकमंगलला पर्याय द्या..
- लोकमंगल ही एक चळवळ आहे. वृद्ध, निराधार माता-पित्यांच्या मुखात दोन घास प्रेमाने भरविणारी ही संस्था आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यातून गरजू गरिबांना आधार देणारी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी सातत्याने धडपडणारी ही संस्था समाजाच्या उद्धारासाठी काम करते. तिला संपविण्याची भाषा करण्याऐवजी या संस्थेला पर्याय देणारी संस्था उभारा, अशा शब्दात सहकार मंत्री देशमुख यांनी आ. प्रणिती शिंदे यांनी निंबर्गीत केलेल्या वक्तव्याला नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
-------------------------
लोण्याच्या गोळ्यासाठी एकी
- साडेतीन वर्षांत एकमेकांची तोंडे न बघणारी नेतेमंडळी आता एकत्र आली आहेत. विकासकामासाठी नाही, जनतेच्या भल्यासाठी नाही तर बाजार समितीच्या लोण्याचा गोळा घशात घालण्यासाठी ते एकत्र आले आहेत. त्यांनी शेतकºयांसाठी आजपर्यंत काय केले? याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. निवडणुकीत त्यांना जाब विचारा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले.