माढ्यात गावोगावी फुटू लागले प्रचाराचे नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:06+5:302021-01-08T05:12:06+5:30
कुर्डुवाडी : गावोगावी आता ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुकले असून, मतदारांना आकृष्ट करण्यासाठी उमेदवारांकडून प्रलोभने, आश्वासनाची खैरात सुरू झाली ...
कुर्डुवाडी : गावोगावी आता ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुकले असून, मतदारांना आकृष्ट करण्यासाठी उमेदवारांकडून प्रलोभने, आश्वासनाची खैरात सुरू झाली आहे. प्रचाराचे नारळ वाढवून प्रचार जोरात सुरू झाला आहे.
माढ्यात एकूण ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्यातून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी तब्बल आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ७४ ग्रामपंचायतीमध्येच निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. निवडणुका लागलेल्या गावांतून सध्या विविध गटांतून, अपक्षांकडून प्रचाराचे नारळ फुटू लागले आहेत. काही उमेदवार तर त्याच देवळांत आपल्या गटात आपल्याविषयी काही अंतर्गत कुरघोडी होऊ नये म्हणून तेथील भंडारा उचलून शपथ घेण्याच्या कार्यक्रमही करत असल्याचे दिसत आहेत.
अनेक गावांत निवडणूक रिंगणातील उमेदवार व गटप्रमुख प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आपल्या वॉर्डातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भल्या मोठ्या आश्वासनांची त्यांच्यावर खैरात करू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता गावोगावी निवडणुकीच्या प्रचारात खरी चुरस निर्माण होऊ लागली आहे. माढा तालुक्यात बिनविरोध आलेल्या निमगाव (टे), सापटणे (भो), जामगाव, महातपूर, वडाचीवाडी( त.म), खैराव, फूटजवळगाव, धानोरे या ग्रामपंचायती सोडून आता राहिलेल्या ७४ ग्रामपंचायतींतील सदस्यांच्या जागेसाठी १ हजार ३९३ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. याबरोबरच बिनविरोध झालेल्या आठ ग्रामपंचायती वगळता इतर २० ग्रामपंचायतमधलेही ५९ सदस्यही बिनविरोध निवडणूक आले आहेत.
तरुणाईचा सहभाग अनेकांची गोची
सध्या प्रत्येक गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक गावांतील होतकरू, तरुण, सुशिक्षित व उच्च शिक्षितांनी सहभाग घेतला असल्याने अनेकांची गोची आहे. येथील मोडनिंब, कुर्डू, लऊळ, उपळवाटे, बारलोणी, उपळाई (बु.), वरवडे, भुताष्टे, अकुलगाव, मानेगाव, केवड, वाकाव, व्होळे (खु.)अशा अनेक मोठ्या गावांतून निवडणूक चुरसीने होऊ लागली आहे.