मृतदेहाची शीतपेटी आता सोलापूरकरांसाठी बनली गरजेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:33 PM2020-06-17T12:33:49+5:302020-06-17T12:36:04+5:30
सोलापूरकरांच्या बदलत्या मानसिकतेची झलक; नैसर्गिक मृत्यू झाला असला तरीही दोन तासांसाठी कोणतीच रिस्क घेण्याची नाही लोकांची तयारी
रवींद्र देशमुख
सोलापूर : कधीकाळी मुंबई-पुण्यातील उच्चभ्रू समाजात वापरली जाणारी मृतदेहाची शीतपेटी सध्या सोलापूरकरांसाठी गरजेची वस्तू बनत चालली आहे. किमान बारा-अठरा तास मृतदेह घरी ठेवण्यासाठी पूर्वी उपयुक्त असणारी ही शवपेटी कोरोना काळात केवळ दोन-तीन तासांसाठीही सर्वसामान्यांकडून मागविली जात आहे. मृतदेहाच्या रक्षणापेक्षाही नातेवाईकांच्या सुरक्षेपोटी मागविली जाणारी ही शवपेटी म्हणजे सोलापूरकरांच्या बदलत्या मानसिकतेची झलकच ठरली आहे.
विश्वनाथ येलदी हे तसे ट्रॉली चालक. त्यांच्या नातेवाईकांचं निधन झालं आणि मृतदेह दीर्घकाळ घरी ठेवण्याची गरज निर्माण झाली तेव्हा त्यांना मृतदेहाची शीतपेटी भाड्यानं देण्याच्या व्यवसायाची कल्पना सूचली. त्यावेळी मार्कंडेय रूग्णालयात एक शीतपेटी होती. ती विस्तीर्ण सोलापूरसाठी अपुरी ठरत होती.
येलदींनी ठरवलं, स्वत:चा जोडधंदा अन् सोलापूरकरांची एक सेवा म्हणून मृतदेहाची शीतपेटी भाड्यानं देण्याचा व्यवसाय करायचा; मग या शीतपेट्या कुठं मिळतात, याचा शोध सुरू झाला... हैदराबादला याचं एक शोरूम असल्याचं कळालं तेव्हा येलदी तेथे गेले अन् पैशाची जमवा-जमव करून एक लाख रूपये किमतीच्या दोन शीतपेट्या खरेदी केल्या.
एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा बºयाचदा लगेच अंत्यसंस्कार करता येत नाहीत. नातेवाईकांसाठी एक-एक दिवस प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी व्यक्ती गंभीर आजाराने मृत पावली असेल तर संसर्गाचा धोका असतो. शिवाय मृतदेह कुजण्याची प्रक्रिया लगेचच सुरू होते.
नातेवाईकही बºयाचदा मृतदेहाच्या अंगावर पडून विलाप करतात. यावेळी संसर्गाचा धोका वाढतो; पण बर्फ किंवा अशी शीतपेटी असेल तर मृतदेह अंत्यसंस्कारापर्यंत व्यवस्थित राहतो.. येलदी यांच्या व्यवसायामुळे सोलापुरात आता मृतदेह एक दिवस प्रतीक्षेत ठेवण्याची सुविधा निर्माण झाली आहे.. अन्यथा बर्फाची लादी आणणे, सगळे घर ओले करणे आणि अन्य आरोग्याचे धोक्यांना सामोरे जाणे, हे सारंच त्रासाचं होतं.
सोलापुरात आठवड्याला कधीतरी एकदा श्रीमंत वर्गाकडून ही शवपेटी मागवली जायची. मात्र, कोरोना काळात दिवसातून चार-चार वेळाही सेवा देण्याची वेळ येलदी यांच्यावर आली. नैसर्गिक कारणाने मृत्यू झालेल्या मृतदेहासाठीही शवपेटी मागविण्याची तयारी अनेकजण करत आहेत. मग केवळ दोन तासांसाठीही हा मृतदेह घरात ठेवण्याचे नियोजन असले तरीही सध्या कोणतीच रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नातेवाईक नाहीत, कारण मृतदेहाच्या रक्षणापेक्षाही नातेवाईकांच्या सुरक्षेची चिंता अनेकांना अधिक भेडसावत आहे.
नेत्रदान करणाºयांना मोफत सेवा !
- येलदी यांनी जेव्हा शवपेटीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा कित्येक दिवस घरात प्रचंड रडारड होत होती. वडिलांनी बोलणेही सोडले होते. मात्र, यातून जेव्हा रोज लक्ष्मी घरी येऊ लागली, तेव्हा वातावरण शांत झालं. त्याच्या आईचं निधन झालं, तेव्हा त्यांनी तिचं नेत्रदान केलं. तसेच सोलापुरात नेत्रदान करणाºयांना शवपेटीची मोफत सेवा देण्याचीही परंपरा त्यांनी सुरू केली आहे.