कडक उन्हामुळे गाड्यांवर कोल्ड्रिंक पिताय ? मग सावधान...शीतपेयांमध्ये क्षार, नायट्रेट, फ्लोराईडयुक्त पाणी तर नाही ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:30 PM2019-03-04T14:30:12+5:302019-03-04T14:32:31+5:30
संतोष आचलारे सोलापूर : सध्या सोलापुरात कडक ऊन पडतंय. दिवसा कामानिमित्त मार्गस्थ होताना तहान नक्कीच लागणार! मग घशाला कोरड ...
संतोष आचलारे
सोलापूर : सध्या सोलापुरात कडक ऊन पडतंय. दिवसा कामानिमित्त मार्गस्थ होताना तहान नक्कीच लागणार! मग घशाला कोरड पडलेली असताना रस्त्यावर, चौकात दिसणारा शीतपेयाचा गाडा लक्ष वेधून घेतो अन् आपण थंडगार सरबत, मस्तानी किंवा अन्य शीतपेय घेण्यासाठी पुढे सरसावतो; पण ही रस्त्यावरची पेयं घेताना त्यामध्ये वापरल्या जाणाºया पाण्याबाबत जागरूक असणे गजेचे आहे.
शीतपेयामध्ये मिसळले जाणारे पाणी क्षार, फ्लोराईड, नायट्रेट, अरसेनिक यासारख्या रासायनिक घटकांनी युक्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे विक्रेत्याला हे पाणी कुठून, कधी, कसे आणले, हे विचारणे आवश्यक आहे. कारण अशा दूषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अन्न औषध प्रशासनाकडून या विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ‘लोकमत’ ला दिली.
ऊन वाढल्याने ग्राहकांची पावले शीतपेय विक्रेत्यांच्या दुकानाकडे वळत आहेत; मात्र अनेक ठिकाणी भेसळयुक्त असणारा बर्फ, पिण्यास अयोग्य पाणी शीतपेयांत वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या स्थितीत शीतपेय विक्री करणाºया विक्रेत्यांनी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर यात करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असाही इशारा राऊत यांनी दिला आहे.
शीतपेयांची विक्री करणाºया विक्रेत्यांनी अन्नसुरक्षा कायद्यानुसार या विभागाची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. विनापरवाना शीतपेयांची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. शीतपेयांत वापरला जाणारा बर्फ किंवा पाणी याची तपासणी प्रयोगशाळेतून करून घेणे आवश्यक आहे. अतिक्षारयुक्त व जैविक विषाणू असणाºया दूषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. विक्रेता ज्या ठिकाणातील पाणी वापरतात तेथील पाण्याचा प्रयोगशाळेचा तपासणी अहवालही असणे आवश्यक आहे. शीतपेयांत वापरण्यात येणाºया पाण्याची तपासणी अन्न प्रशासनाकडून प्रयोगशाळेत करण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.
शहरात केवळ १०२ शीतपेय विक्रेत्यांची नोंद
- सोलापूर शहरात प्रत्येक चौकात किमान पाच तरी शीतपेय विक्रेते दिसून येतात. शहरात दोन हजारांपेक्षा जास्त शीतपेय विक्रेते असल्याचे सहजच दिसून येते. अन्न प्रशासन विभागाकडे मात्र केवळ १०२ सर्व प्रकारच्या शीतपेय विक्रेत्यांची नोंद आहे. भेसळयुक्त शीतपेयांवर नियंत्रण आणण्यासाठी या विक्रेत्यांनी नोंदणी करून घेण्यासाठी अन्न प्रशासनाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे.
पेयांत न वापरल्या जाणाºया बर्फात निळा रंग सक्तीचा
- शीतपेयांची विक्री करणाºया ठिकाणी पांढरा बर्फ वापरला जातो. हा बर्फ अनेकदा पिण्यास अयोग्य असणाºया पाण्यापासून बनवला जातो. अन्न प्रशासनातील अधिकारी तपासणीसाठी गेले असता दुकानातील बर्फ शीतपेयांत घालण्यासाठी नव्हताच, अशी भूमिका घेतात. त्यामुळे शीतपेयांत न वापरल्या जाणाºया बर्फात विक्रेत्यांनी निळा रंग टाकावा, अन्यथा हा बर्फ शीतपेयांत वापरला जाणार होता, असे गृहीत धरून त्याची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे.