आठवीत शिकणाºया यशराजकडे पाचशे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:21 PM2019-11-14T13:21:29+5:302019-11-14T13:23:30+5:30
बालदिन विशेष...
यशवंत सादूल
सोलापूर : कुमठा नाका परिसरातील नागेंद्र नगर येथील बालभारती विद्यालयातील आठवी इयत्तेत शिकत असलेल्या यशराज निंबाळकर याने दुर्मिळ जुनी नाणी व नोटा गोळा करण्याचा छंद जोपासला आहे. अमेरिकेचे डॉलर, कॅनडाचे कॅनेडियन डॉलर, सौदी अरबचे रियाल, कुवैतचे दिनार, सिंगापूरचे सेंट असे देश विदेशातील जवळपास पाचशे दुर्मिळ नाणी व नोटा जमा केल्या असून भारतीय चलनानुसार त्यांची किंमत जवळपास दहा हजार रुपये इतकी आहे.
यशराजचे वडील हे गवंडी कामगार असून, प्रतिकूल परिस्थितीत ही त्याने हा छंद जोपासला आहे. त्याचे आजोबा विश्वनाथ निंबाळकर यांनी भविष्यातील पुंजी म्हणून फार वर्षांपासून पैसे साठवून ठेवले होते. आर्थिक अडचण आल्याने त्यांनी ते पैसे मुलगा निरंजन यांच्याकडे सोपविले़ बºयाच वर्षांपूर्वीची नाणी असल्याने त्यातील निम्मी चलनातून बाद झाली होती़ या पैशाचे काय करायचे ? याचा काहीच उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी यशराजला खेळण्यासाठी चार वर्षांपूर्वी ही नाणी दिली. त्याने त्याचा सदुपयोग करीत त्याचा संग्रह केला़ आणखी काही जुनी नाणी, नोटा जमविण्यास त्याने सुरुवात केली. नातेवाईक, मित्रमंडळी, मंगळवार बाजार, जुने किराणा दुकानदार अशा मिळेल तेथून तो जुनी नाणी गोळा करतो़ त्याच्या छंदाला दाद देत काही जण त्याला नाणी व नोटा काहीच मोबदला न घेता देतात तर काही जण पैसे घेऊन देतात़ अशावेळी त्याला बालभारती विद्यालयाचे शिक्षकवर्ग मदत करतात़ आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्याने आपला छंद जिद्दीने जोपासला आहे़ त्याच्याजवळ दहा हजार रुपयांच्या नाणी आणि नोटा आहेत़ यामध्ये भारतीय दुर्मिळ नोटा आणि नाण्यांचा संग्रह आहे.
२५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने १९७२ मध्ये प्रकाशित केलेली दहा रुपयांची चांदीची नाणी असून त्याची बाजारातील सध्याची किंमत जवळपास सोळाशे रुपये इतकी आहे़ इतिहास हा यशराजच्या आवडीचा विषय असून त्यातच मास्टरी मिळवायचा त्याचा मानस आहे़ रविवारी व सुट्टीच्या दिवशी त्याची भटकंती मिळेल तिथून दुर्मिळ व जुनी नाणी गोळा करण्यासाठीच असते़ जर एखादे नाणे मिळाले की आपल्या मित्रांना ती कशी मिळवली त्याची रंजक कहाणी सांगून त्यातून आनंद मिळवतो़
यशराज निंबाळकर हा शिवगंगा नगर येथे राहतो. त्याचे वडील व आजोबा दोघेही गवंडी काम करतात. त्याची आई ही घरकाम करते.
दिनार, सेंट आणि रियाल...
त्याच्याजवळील संग्रहात सौदीचे रियाल, कॅनडाचे कॅनेडियन डॉलर, अरब अमिरात, कुवेत दिनार, नेपाळचा रुपया, सिंगापूरची सेंट, निजामशाहीतील नाणी, यासह आठ ते दहा विविध देशांतील चलनातील नोटा देखील आहेत. भारतातील डब्बू पैसा एक व दोन आना, कवडी फुटी, कवडी पैसा अशा विविध प्रकारच्या नाण्यांचा संग्रह आहे.
यशराज हा शांत, संयमी, अत्यंत जिज्ञासू विद्यार्थी आहे. आजोबांनी दिलेल्या चलनातून बाद झालेल्या जुनी नाणी संग्रह तर केल्याच त्यात भर घालीत त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इच्छशक्तीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर नाणी, नोटा गोळा करीत आहे.त्याचा आगळा वेगळा छंद आमच्या बालभारती विद्यालयास अभिमानास्पद आहे़ त्याची कीर्ती राज्यभर पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत़
- रिजवान शेख
मुख्याध्यापक, बालभारती विद्यालय