भंगारातील वस्तू गोळा करून जमविला शिवकालीन दुर्मीळ वस्तूंचा संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:58+5:302020-12-11T04:48:58+5:30
बार्शी : अज्ञान अन् पैशासाठी इतिहासकालीन शस्रस्र, दुर्मीळ वस्तू भंगारात घातल्या जातात. अशी भंगारात गेलेली शस्रे इतर पुरातन ...
बार्शी : अज्ञान अन् पैशासाठी इतिहासकालीन शस्रस्र, दुर्मीळ वस्तू भंगारात घातल्या जातात. अशी भंगारात गेलेली शस्रे इतर पुरातन वस्तू वितळवून त्याचा वापर नवीन वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. या प्रकारामुळे इतिहासाची साक्ष देणारा हा अमूल्य ठेवा वितळवून नामशेष होतो. हाच प्रकार थांबवण्याची धडपड गेल्या काही वर्षांपासून बार्शीतील माधवराव उत्तमराव देशमुख करीत आहेत. त्यांनी तब्बल ४८० वस्तूंचा संग्रह केला आहे.
२०१४ साली एकवीरा आई देवस्थानतर्फे बार्शीतील भगवंत मंदिर येथे हे कोल्हापूरस्थित नानासाहेब सावंत यांच्या इतिहासकालीन शस्रांचे प्रदर्शन भरवले होते. यात माधवराव देशमुख यांना संधी मिळाली. प्रदर्शनाच्या माध्यमातून देशमुख यांना इतिहासकालीन शस्रांचे महत्त्व पटले आणि यामुळेच अशी शस्रे व पुरातन वस्तू संग्रह करण्याची आवड त्यांना लागली. सुरुवातीच्या काळात त्यांनी शस्रांचा व इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी विविध गावांमधून, नातेवाइकांच्या माध्यमातून व भंगारातून संग्रहित केल्या.
या दुर्मीळ शस्र संग्रहातून येणाऱ्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचविण्यास मदत होत आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा छंद आपण जोपासला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यासोबतच लाठी, दांडपट्टा चालविण्याचेही शिक्षण ते मोफत देतात. शिवपुत्र संभाजी महानाट्य तसेच म्होरक्या, हिंदू टायगर, आकर्षण, निर्धार, गाठ, छबी अशा विविध चित्रपटांमध्येदेखील देशमुख यांनी काम केले आहे.
..असा आहे दुर्मीळ शिवकालीन वस्तुसंग्रह
तब्बल ४८० इतिहासकालीन शस्रे व अतिदुर्मीळ वस्तू त्यांच्याजवळ संग्रहित आहेत. त्यामध्ये रजपूत तलवार, मराठा तलवार, खांडा तलवार, इंग्रजकालीन तलवार अशा विविध तलवारी. तसेच सोने-चांदीचे ओझरते नक्षीकाम असलेल्या कट्यारी, खंजीर, बिचवा, गुर्ज, शिरस्थान, दांडपट्टा, गेंड्याच्या कातडीची ढाल, अंकुश विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, विटा, चिलखत, हातामधील दस्तान अशा शस्रांबरोबरच ब्रिटिशकालीन कुलपे, पुरातन खुरपे, पेरणीचे चाडी यंत्र, पानपुडे, अडकित्ते, घोड्याचे लगाम, पितळी मशाल, पिकदाणी असे विविध शस्रे व वस्तू यांचा संग्रह देशमुख यांनी केला आहे. हा संग्रह जमा करण्यासाठी उमेश काळे, नगरसेवक दीपक राऊत, अतुल पाडे, ऋषी पाटील यांचे खूप सहकार्य लाभले. ही दुर्मीळ शस्रे -वस्तू इतिहासाची साक्ष देतात, अशी शस्रे सुरक्षित जपून ठेवण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.
फोटो
१०बार्शी शस्रसाठा
बार्शीतील माधवराव देशमुख यांनी जमा केलेल्या याच त्या शिवकालीन दुर्मीळ वस्तू.