दोन हजार छायाचित्रांच्या संग्रहातून जपलेत महामानवाच्या जीवनातील क्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 09:55 AM2019-12-06T09:55:24+5:302019-12-06T09:57:08+5:30
शांतीकुमार नागटिळकांचा ध्यास : आंदोलने, दीक्षाभूमी सोहळा अन् बºयाच फोटोंचा खजिना; राज्यातील विविध शहरांत भरविले प्रदर्शन
यशवंत सादूल
सोलापूर : भारतीय समाजातील शोषित, पीडित, निराश्रित माणसांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी हक्क मिळवून देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजीवन संघर्ष केला. मूलभूत अधिकारांपासून वंचित असलेल्या सर्वांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार मिळवून देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून लढा देणाºया बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून संचित झालेले आहेत़ या चित्रांचा शोध घेऊन सरकारी दस्तऐवज, आॅटोबायोग्राफी, अनुयायांकडून गोळा करून जवळपास दोन हजार चित्रांचा संग्रह करून ठेवला आहे, शांतीकुमार नागटिळक यांनी.
मागील पंधरा वर्षांपासून त्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून महामानवांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत़ पेशाने छायाचित्रकार असलेल्या शांतीकुमार यांनी २००४ सालच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत बाबासाहेबांच्या जीवनातील पंचवीस छायाचित्रे प्रदर्शित केली होती़ त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबेडकरप्रेमींनी त्या फोटोंसमोर सेल्फी काढून घेत दाद दिली़ आणखी दुर्मिळ छायाचित्रे मिळवून त्याचे प्रदर्शन भरविण्याचा निश्चय करून नागटिळक यांनी राज्यभर भ्रमंती केली.
पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेज, नागपूर येथील चिंचोळी संग्रहालय, मुंबईच्या राजगृह संग्रहालय, औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय येथून जमा केले़ बाबासाहेबांसोबत काम केलेले त्यांचे अनुयायी व त्यांच्या वारसांकडून ही छायाचित्रे जमा केली असून, त्याला जवळपास दोन ते अडीच वर्षे लागली. बाबासाहेबांच्या जीवनातील चवदार तळे आंदोलन, काळाराम मंदिर सत्याग्रह, दीक्षाभूमी बौद्ध धर्म दीक्षा सोहळा, अजंठा-वेरूळ भेट, घटना समिती बैठक, कॉलेज जीवनातील काही प्रसंगांची छायाचित्रे जमा केली़ सोलापूरशी संबंधित महार वतन परिषदेत सहभाग, पंचाची चावडी परिषद, बी. सी. होस्टेलला भेट या छायाचित्रांचाही यामध्ये समावेश आहे.
काही फोटो हे मूळ स्वरूपात मिळाले तर काही सरकारी दस्तऐवज, त्यांच्या आॅटोबायोग्राफी पुस्तकातून तर काही त्यांचे अनुयायी वारसदारांकडून मिळवले आहेत़ या सर्व दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन २००७ पासून भरविण्यास सुरुवात केली आहे़ बारा बाय अठरा इंच साईजची ही छायाचित्रे असून, सर्व कृष्ण- धवल आहेत. सोलापूरव्यतिरिक्त औरंगाबाद, बीड, मुंबई येथेही प्रदर्शन भरविण्यात आले़
दुर्मिळ छायाचित्रे...
महाडचे चवदार तळे आंदोलन, बौद्ध धर्म दीक्षा, काळाराम मंदिर सत्याग्रह यासह नेपाळ बौद्ध परिषद, डॉ़ श्यामाप्रसाद मुखर्जी, संत गाडगेबाबा, छत्रपती शाहू महाराज आदींची भेट, त्यांच्या कॉलेज जीवनातील काही दुर्मिळ फोटो, परिवारासोबतचे फोटो, कायदे मंत्री म्हणून शपथ घेताना, घटना समिती सदस्यांसोबत, घोड्यावर स्वार, कॅमेºयाने स्वत: फोटो काढताना, भीमा-कोरेगावला भेट, महार रेजिमेंटला भेट, त्यांचे अखेरचे महानिर्वाण झाल्यानंतरचे भावनाप्रधान प्रसंग या दुर्मिळ चित्रांमध्ये समावेश आहे.
भारतरत्न डॉ़ बाबासाहेबांच्या जीवनावरील दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन अकरा वर्षांपासून भरवत आहे़ या माध्यमातून त्यांच्या कार्यास उजाळा देत समाजप्रबोधन करणे हा हेतू आहे़ यातूनच बाबासाहेबांचे सहकारी भालेराव यांच्याकडून सोलापूर भेटीची दुर्मिळ चित्रे मिळाली. वळसंगला भेट दिल्याची चित्रे मिळाली नाहीत, याची सल मनात आहे. आणखी चित्रे मिळविण्याचा प्रयत्न सतत करणार आहे़
- शांतीकुमार नागटिळक, संग्राहक