कलेक्टरनी चाखली पेरूच्या चेरीची चव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:16+5:302021-08-14T04:27:16+5:30
कुर्डूवाडी : रानभाज्यांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी जिल्हाभर रानभाज्या महोत्सव होऊ लागला आहे. कुर्डूवाडीत या महोत्सवास खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. ...
कुर्डूवाडी : रानभाज्यांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी जिल्हाभर रानभाज्या महोत्सव होऊ लागला आहे. कुर्डूवाडीत या महोत्सवास खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. बचतगटांतील महिलांकडून पेरूच्या चेरीची चव चाखली. दुपारच्या जेवणासाठीही खरेदी केली.
माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कुर्डूवाडी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव सप्ताह बुधवारी पार पडला. याचे उद्घाटन आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बैठकीनिमित्त सोलापूरहून कुर्डूवाडीला आलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही विशेष उपस्थिती लावली. १३ महिला बचतगटांच्यावतीने लावण्यात आलेल्या विविध रानभाज्यांच्या स्टाॅलला भेटी दिल्या. पेरूपासून बनविलेल्या चेरीची चव चाखून दुपारच्या जेवणासाठी ती खरेदीही केली.
या रानभाज्या महोत्सवात घोळ, चिघळ, पिंपळ, हादगा, कुंजीर, टाकला, शेवगा, करडई, कुरडू, कडवंची, कपाळ फोडी, पाथरी, अळू, आघाडा, उंबर, कवठ, केना, पानाचा ओवा, तांदुळसाना, अंबाडी, बटन मशरूम यासारख्या २३ वेगवेगळ्या भाज्या स्टॉलवर लावण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमास प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोराटे, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, विठ्ठल कवठे आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी ‘आत्मा’चे आनंद झिंने, शैलेश घोडके, अनिल फडतरे, चांदणी भालेराव यांनी परिश्रम घेतले.
---
फोटाे : १३ कुर्डूवाडी
महोत्सवात रानभाज्यांची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार बबनदादा शिंदे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी हनुमंत बोराडे
120821\5055img-20210812-wa0256.jpg
रानभाज्या महोत्सव कुर्डूवाडी बातमी फोटो