सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराच्या स्वच्छतेसाठी महाविद्यालयीन युवक-युवतींचा ग्रुप मुक्कामालाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:06 PM2018-12-27T13:06:39+5:302018-12-27T13:10:55+5:30
सोलापूर : ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देशमें अपने वादा कर लिया हमने, स्वच्छता के देशमें त्यौहार ...
सोलापूर : ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देशमें अपने वादा कर लिया हमने, स्वच्छता के देशमें त्यौहार करना है!’, दररोज सकाळी कानी पडणारे हे गीत संगमेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने यात्रेच्या आधीच कृतीत आणल्याचे चित्र बुधवारी सकाळी पाहावयास मिळाले. ‘स्वच्छता के शहरमें त्यौहार (यात्रा) करना है!’ असा संदेश देत महाविद्यालयीन युवक-युवतींनी स्वच्छतेसाठी मंदिरातील यात्री निवासातच मुक्काम ठोकला आहे.
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त महिनाभर गड्डा मैदान फुललेले असते. अक्षता सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी असते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत यंदा संगमेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वितीय स्तर विभागाच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर आणि परिसरात श्रमदान करण्यासाठी अकरावी आणि बारावीतील ३२ युवक-युवती सोमवारी (२४ डिसेंबर) पाच दिवसांच्या मुक्कामासाठी मंदिरात दाखल झाले.
पहाटे ५ वाजता उठणे, ६ वाजता योग अन् व्यायाम आणि त्यानंतर सकाळी ७ ते ८.४५ पर्यंत श्रमदान, नाश्ता करून पुन्हा सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत श्रमदान असा नित्याचा उपक्रम ठरलेला. सारं काही वेळेत करताना तीन दिवसांमध्ये मंदिर चकाचकही केलं.
पठाणबाग ते मुख्य प्रवेशद्वार, तेथून अमृतलिंग, योगसमाधी आणि परिसर, सभामंडपासह भुईकोट किल्ला मार्गावरील कचराही हटविण्यात आला.
शिवाय मार्गावर पडलेले खड्डे बुजवून युवक-युवती श्रमदानाची मोहीम यशस्वी करीत आहेत. प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी, प्रा. विश्वनाथ ककळमेळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक-युवती अगदी जीव तोडून श्रमदानात सहभागी झाले आहेत.
पंच कमिटीतर्फे ५० डस्टबीन; घंटागाड्याही येणार
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘स्वच्छ भारत, स्वच्छ सोलापूर अन् स्वच्छ यात्रा’ हा कानमंत्र घेऊन यात्रा कमिटीच्या स्टॉल वाटप समितीने यंदा ५० डस्टबीनची खरेदी केली असून, खाद्यपेय विक्रेत्यांच्या स्टॉल्समध्ये हे डस्टबीन मोफत देण्यात येणार असल्याचे समितीचे चेअरमन बाळासाहेब भोगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याशिवाय महापालिकेला पत्र देऊन यात्रा कालावधीत दररोज सकाळी घंडागाड्या मागवून डस्टबीनमध्ये साचलेला कचरा हटविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदाच्या यात्रेत मंदिर परिसरात हिरवीगार झाडे दिसावीत म्हणून दररोज त्यांना पाणी घालण्याचे काम युवक-युवती करीत आहेत. श्रमदानाबरोबर ग्रामदैवताच्या चरणी मुलांची सेवा रुजू व्हावी, यासाठी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.
-प्रा. हर्षवर्धन पाटील
रासेयो- संगमेश्वर महाविद्यालय.
श्री सिद्धेश्वर मंदिर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून युवक-युवतींकडून स्वच्छता करण्यात येत आहे. यात्रेच्या आधी मंदिर परिसर चकाचक झाला पाहिजे, अशी शपथ युवक-युवतींनी घेतली आहे. यात्रेच्या आधी सेवा करण्याची संधी मिळाली.
-प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी
रासेयो- संगमेश्वर महाविद्यालय