२०२४ ला रिंगणात या; कोण कोणाविरुद्ध शड्डू ठोकेल हे जनता ठरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:46+5:302021-05-05T04:35:46+5:30
दिवंगत भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर भगीरथ भालके हे सहज विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला ...
दिवंगत भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर भगीरथ भालके हे सहज विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भाजपने ही पोटनिवडणूक राज्य पातळीवरचा मुद्दा बनवत महाविकास आघाडीसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यानंतरही भगीरथ भालके यांनी काट्याची टक्कर दिली. मात्र, या त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. यामुळे ते खचून न जाता दुसऱ्याच दिवशी सरकोलीतील त्यांचे निवासस्थान व पंढरपूर-मंगळवेढा येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन दोन्ही तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्ते, मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मागील निवडणुकीत दिवंगत भारत भालकेंना ८९ हजार मते मिळाली होती. आत्ताच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली.
यावेळी भगीरथ भालके यांनी आमदार परिचारकांनी छत्रपती शिवाजी चौकात बदला म्हणून ठोकलेल्या शड्डूवर नाराजी व्यक्त केली. आपण निवडणूक प्रचारादरम्यान पंढरपूर देवभूमी तर मंगळवेढा हे संतभूमी आहे. त्यामुळे या ठिकाणी हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल प्रचारात बोलू नये, असे आवाहन केले होते. स्व. भारत भालके हयात असताना त्यांच्यासमोर साधे उभे राहण्याचे धाडस दाखविणे सोडा, निवडणुकीत आजूबाजूलाही फिरकणेही आमदार परिचारकांना शक्य झाले नव्हते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांची नक्कल करत बदला घेतल्याचा आव आणत, त्यांनी शिवाजी चौकात शड्डू ठोकला. हे चुकीचे असून, त्यांना शड्डू ठोकायचा असेल, तर २०२४ ला स्वत: माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरावे, त्यावेळी जनता त्यांना उत्तर देईल, असे मत व्यक्त केले.
आपण कोणत्या गावात कशामुळे मागे राहिलो, अपेक्षेप्रमाणे मताधिक्य का मिळाले नाही, याची प्रत्येक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. मात्र, निसटत्या मतांनी पराभूत झालो असलो, तरी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने माझ्यावर दु:खाचा डोंगर असताना, एकट्याला न सोडता माझ्यापाठीमागे खंबीरपणे उभे राहात, स्व. भारत भालके यांच्यापेक्षाही जास्त मते देत माझ्यावर प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी होत खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचा धीर त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी भगीरथ भालके यांना स्व.भारत भालके यांनी ज्या ज्या गावातून मताधिक्य मिळायचे, त्या गावात यावेळी कमी मताधिक्य मिळाले, तर काही गावांमध्ये मताधिक्यच मिळाले नाही. याची कारणे जाणून घेतली. तरीही कार्यकर्त्यांनी खचून न जाता आता नव्याने कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारत २०२४च्या तयारीला लागण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले.
समाधान आवताडेंचे अभिनंदन; दिलेले शब्द पाळावेत
समाधान आवताडे यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत प्रचारादरम्यान त्यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील जनतेला दिलेली आश्वासने पाळावीत, विकासकामांमध्ये आमचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
मंत्र्यांच्या सभांमुळे लोकांमध्ये जाण्यास कमी पडलो. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पराभवाची विविध कारणे विशद केली. त्यावर भगीरथ भालके म्हणाले की, या पोटनिवडणुकीदरम्यान पक्षाने आपल्याला मोठे पाठबळ दिले, आधार दिला. अनेक मोठे नेते, मंत्र्यांचे दौरे, सभा झाल्या. या सभांदरम्यान आपला मोठा वेळ गेला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. अशी मते कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. या चुका दुरुस्त करत भविष्यात आपण स्व. आ. भारत नानांप्रमाणेच कायम कार्यकर्त्यांमध्ये राहणार असल्याचे सांगितले.
कोट :::::::::::::::::::::::::
निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालो असलो, तरी राज्यात आपल्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे आमदारकी असो अथवा नसो, सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न, स्व. नानांच्या अपूर्ण विकास योजना मार्गी लावण्यासाठी नव्या जोमाने काम करणार आहे. प्रत्येक समाजाच्या नागरिकांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा कायम प्रयत्न करू. राष्ट्रवादीचे नेतृत्व यापूर्वी आपल्या सोबत होते. पराभवानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांनी दूरध्वनीद्वारे खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा भक्कम धीर दिला आहे. त्यामुळे भविष्यात भक्कमपणे लढण्याचे बळ मिळेल.
- भगीरथ भालके
फोटो लाईन ::::::::::::::
पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत, पराभवाची कारणे जाणून घेतली.