दिलासादायक; दिल्लीहून १ लाख ६२ हजार पोती तांदूळ सोलापुरात आला
By appasaheb.patil | Published: April 25, 2020 09:32 AM2020-04-25T09:32:09+5:302020-04-25T09:34:08+5:30
रेल्वे प्रशासनाची 'कोरोना' विरुद्ध लढाई; सोलापुरातील औषधे, मास्क, सॅनिटायझर मुंबई, पुणे, सिकंदराबादकडे पार्सल
सुजल पाटील
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन असताना या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी काही एसटी व बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसंच, रेल्वेही मालवाहतूक, पार्सल गाड्यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरवत आहे़ मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून मुंबई, पुणे, कलबुर्गी, सिकंदराबाद या प्रमुख शहरांना मास्क, सॅनिटायरझर, औषधे, पीपीई किटचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणाहून १ लाख ६२ हजार पोती तांदुळ सोलापुरात दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोरोनाशी लढायला लागणाºया सामग्रीची वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभागातून फक्त मालगाड्यांची आणि पार्सल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, काही पीपीई किटची वाहतूक केली जातेय. लॉकडाऊन काळात देशभरात १ हजार १५० टन औषधांचा पुरवठा केला आहे.
दरम्यान, लॉकडाउन काळात शिधापत्रिका धारकांना गहू, तांदुळ व अन्य धान्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न होत आहे़ रेल्वेने आलेला धान्यसाठा औद्योगिक वसाहतीत साठवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
----------
१२६ वॅगन तांदुळ सोलापुरात दाखल...
लॉकडाउनच्या काळात सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रीय खाद्य निगमच्यावतीने ४९ वॅगनच्या तीन अशा १२६ वॅगनने (१ लाख ६२ हजार पोते ) तांदुळ सोलापूर रेल्वे स्थानकावर असलेल्या मालधक्यावर दाखल झाला आहे़ हा आलेला तांदुळ चिंचोळी एमआयडीसी, टिकेकरवाडी धान्यसाठा गोदाम व होटगी गोदामात ठेवण्यात आल्याची माहिती सोलापूर रेल्वे स्टेशन हुंडेकरी असोसिएशनचे सचिव बाबुराव घुगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
-----------------
या आहेत विशेष पार्सल गाड्या...
मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्यावतीने राजकोट-कोईमतूर-राजकोट, मुंबई-वाडी-मुंबई, यशवंतपूर - निझामुद्दीन, निझामुद्दीन - यशवंतपूर या विशेष पार्सल गाड्या सोलापूर रेल्वे विभागातून नियमित धावत आहेत़ या पार्सल गाड्यांतून प्रवासी वाहतूक होता कामा नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे जवान तैनात करण्यात आले आहेत़ पार्सल वाहतुकीत औषधे, मास्क, सॅनिटायझरसह जीवनाश्यक वस्तुंना प्राधान्य देण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
-------------
जीवनाश्यक वस्तू व पार्सल वाहतुकीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत़ आतापर्यंत ३१५ किलो औषधे, ३२० किलो मास्क, ११० किलो पीपीई किट, २१० किलो सॅनिटायझरचा पुरवठा सोलापुरातून करण्यात आला आहे़ मालवाहतूक गाड्या सुरूच आहेत़ पार्सलची संख्या वाढल्यास गाड्यांचीही संख्या वाढविण्यात येणार आहे.
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर रेल्वे
-------------
सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धान्यांचा तुटवडा भासू नये यासाठी माथाडी कामगार दिवस रात्र काम करून परराज्यातून रेल्वेने आलेले धान्य उतराई अन् पुन्हा ट्रकमध्ये चढाई करण्याचे काम करीत आहेत़ त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे व जिल्हा प्रशासन, कामगार आयुक्तांकडून मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा़ दरम्यान, माथाडी कामगारांना विमा कवच मिळवून द्यावे़
- बाबुराव घुगे,
सचिव - माथाडी कामगार, सोलापूर रेल्वे स्थानक