दिलायादायक; सोलापूर महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्मलेल्या बालिकेस बेबी किट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 02:46 PM2022-07-26T14:46:50+5:302022-07-26T14:46:57+5:30
५ कोटींच्या विवरण पत्रकास मान्यता : विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता
सोलापूर : महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्मलेल्या बालिकेस बेबी किट, महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता देण्यात येणार आहे. यासह विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या या आर्थिक वर्षातील अंदाजे ५ कोटींच्या विवरण पत्रकास उपसमितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या प्रत्यक्षात उत्पन्नाच्या ५ टक्के खर्चाची तरतूद राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
महिला व विद्यार्थिनींसाठी आवश्यक असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी व एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा पास झालेल्या मुलींसाठी अभ्यासिका व इतर आर्थिक सहकार्य योजना महत्त्वपूर्ण आहे. जननी शिशू आहार योजना, संगणक प्रशिक्षण, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळ भेट कार्यक्रम आदी महत्त्वपूर्ण योजनांचा यामध्ये समावेश आहे.
सोलापूर शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थिनींसाठी महापालिकेच्या या विभागातर्फे मोफत बससेवा घर ते शाळा ही योजना सुरू आहे. पहिली ते दहावीतील या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी दीड कोटीची तरतूद याकरिता केली आहे. सध्या अकराशे विद्यार्थिनींना याचा लाभ मिळतो.
-----
सॅनिटरी नॅपकीन मशीन व भत्ता
महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना यावर्षीपासून शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला दरमहा साधारण दोनशे ते अडीचशे रुपये भत्ता मिळणार आहे. याकरिता वार्षिक ३० लाख रुपये तरतूद आहे. महापालिकेचे सर्व प्रसूतिगृह, शासकीय कार्यालय, तसेच इयत्ता सातवी ते दहावीच्या शाळांमध्ये या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहे. त्यासाठी वीस लाख रुपयांची तरतूद आहे.