दिलासादायक; प्रतिबंधित भागात एचआयव्ही बाधितांनाही घरपोच औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:32 PM2020-05-01T15:32:23+5:302020-05-01T15:33:40+5:30
सोलापूर शहरात ११ प्रतिबंधित क्षेत्र; कोरोना बाधितांची संख्या वाढली
सोलापूर : शहरामधील कन्टेन्टमेंट झोनमध्ये असणाºया रुग्णांना एआरटी सेंटरमध्ये जाऊन औषधे घेणे अवघड झाले आहे. याचा विचार करुन या रुग्णांना २७ एप्रिलपासून घरपोच औषधे देण्यात येत आहेत.
कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कन्टेन्टमेंट झोनचीदेखील संख्या वाढताना दिसत आहे. या परिसरामधील एचआयव्ही बाधितांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी प्लस सेंटरमध्ये जाऊन औषधे घेताना अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून या रुग्णांना घरपोच जाऊन औषधे देण्यात येत आहेत.
कन्टेन्टमेंट परिसरात रुग्णालयाच्या व्हॅनमधून एक समुपदेशक व एक कर्मचारी जातो. तिथे संबंधित रुग्णाला फोन करुन बोलावले जाते. तो रुग्ण आल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्याला औषधे दिली जात आहेत. या परिसरात जाताना कर्मचारी हे शारीरिक अंतर पाळत मास्क, ग्लोव्हज घालून जातात. तालुकास्तरावरही अशी सुविधा दिली जात आहे. तालुकास्तरावर ४८७ रुग्ण, इतर एआरटी सेंटरमधील १९४ रुग्ण, शहरातील ३३ व कन्टेन्टमेंट झोनमधील १६ रुग्णांना औषधे देण्यात येत आहेत. जोपर्यंत लॉकडाऊन सुरु असेल तोपर्यंत सेवा देण्यात येणार आहे.
---------------
फक्त सोलापूर शहर किंवा जिल्ह्यातील रुग्णांनाच नव्हे तर इतर रुग्णांनाही औषधे देण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे दुसºया जिल्ह्यातील रुग्ण सोलापुरात अडकला असेल तर त्यालाही सोलापुरातील केंद्रामधून औषधे देण्याची सुविधा आहे. ते ज्या जिल्ह्यात आहेत तेथील एआरटी केंद्राकडे सोलापुरातून औषधे दिल्याची माहिती कळविण्यात येते.
- डॉ. अग्रजा चिटणीस,
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी प्लस सेंटर, सोलापूर.