दिलासादायक बातमी; सोलापुरात १९ हजार रेमडेसिविर इंजेक्शन शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:59 PM2021-07-29T16:59:26+5:302021-07-29T16:59:32+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : कोरोनाचे रुग्णवाढीचा आलेख कमी
सोलापूर : सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. दरम्यान, कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीला संपूर्ण जिल्ह्यात १९ हजार रेमडेसिविरचे इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोलापुरातील कोरोना रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमीच होती. याच काळात सारी या आजाराने अनेकांना ग्रासले अन् मृत्यूच्या दाढेत घेऊन गेले. दुसऱ्या लाटेत मात्र संसर्ग वाढल्याने कोरोना रुग्णांची संख्या अचानकपणे वाढली. मृत्युदरही वाढला होता. वयोवृद्ध, शुगर, बीपी, दमा व इतर आजार असलेल्या अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शन प्रचंड तुटवडा जाणवला. इंजेक्शनचा काळाबाजारही झाला. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर, इंजेक्शन वाटपाची जबाबदारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे दिली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे इंजेक्शनची मागणी कमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
लसीकरणाचा वेग वाढला...
सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. १८ ते ४४ व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. ४५ वर्षांपेक्षा १८ ते ४४च्या आत वय असलेल्या लोकांमध्ये लस घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातही आता सहजपणे लस मिळू लागली आहे.