दिलासादायक बातमी; जनआरोग्य योजनेमुळे कोरोनावर उपचार परवडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:06 AM2020-07-24T11:06:47+5:302020-07-24T11:08:20+5:30
न्यूमोनियासह २० लक्षणांचा समावेश : १ कोटी ३४ लाखांची बिलं जमा
सोलापूर : न्यूमोनियासह कोरोनाची लक्षणे असलेल्या २० आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याने गरिबांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत जिल्ह्यातील १८ हॉस्पिटल असताना फक्त ७ हॉस्पिटलने दिलेले ५१४ प्रस्ताव या योजनेत मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ ५१४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यात फायनल झालेल्या बिलापोटी संबंधित खासगी व सरकारी रुग्णालयांना १ कोटी ३४ कोटींचे बिल जमा करण्यात आले आहे.
सोलापुरात १८ रुग्णालयांत सोय
जिल्ह्यात या योजनेत समाविष्ट असलेली ४१ रुग्णालये आहेत. पण यातील फक्त १८ रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजनेतील कोविड-१९ चे रुग्ण अॅडमिट करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये अकलूज: क्रिटिकल, देवडीकर, कदम, पंढरपूर: जनकल्याण, कुंभारी: अश्विनी ग्रामीण, बार्शी: जगदाळे, सोलापूर: सिव्हिल हॉस्पिटल, चिडगुपकर, गंगामाई, लोकमंगल, यशोधरा, युगंधर, अश्विनी, मार्कंडेय, धनराज गिरजी, मोनार्क, महिला, चंदन.
या आजारांचा समावेश
पूर्वी या योजनेत आठ आजार होते. आता कोरोना निदानासंबंधित २० बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाच्या लक्षणावरून एम ३क्यू १.३ व एम ३ क्यू १.८ चे निदान असलेल्यांना ५० हजार. एम ३ क्यू १ लक्षणे असलेल्यांना १ लाख २० हजार, एम ३ क्यू १.४ च्या रुग्णास ६५ हजार, १.५ च्या रुग्णास १ लाख, नेप्रोलॉजी: ३५ हजार, पुलमोनोलॉजी: २५ व ५० हजार अशा आठ प्रकारांचा पूर्वी समावेश होता. आता २० ते ८५ हजारांचे पॅकेज देण्यात आले आहे.