दिलासादायक बातमी; कोरोनात काम करणाऱ्या १४२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 10:58 AM2021-09-17T10:58:54+5:302021-09-17T10:59:01+5:30
आरोग्य विभागाचा निर्णय : सुटीच्या दिवशी काम करून तयार केल्या फाइल
सोलापूर : जिल्ह्यात कोरोना महामारीमध्ये काम केलेल्या १४२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ११ तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांतर्गत सेवा दिली जाते. यासाठी जिल्हा आरोग्य संस्थेमध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसहायक, विस्तार अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ असे कर्मचारी कार्यरत आहेत. मार्च २०२० पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी सुरू झाली. महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले, यामुळे जिल्ह्यात महामारी कायद्याचा अंमल सुरू झाला. तेव्हापासून जिल्हा आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाकडील तांत्रिक संवर्गातील कर्मचा-यांच्या सेवाविषयक बाबी प्रलंबित होत्या. तसेच आरोग्य विभागाकडील लिपिक संवर्गातील पदे ब-याच प्रमाणात रिक्त असल्याने ही कामे प्रलंबित राहिलेली होती.
आरोग्य विभागाकडील तांत्रिक कर्मचा-यांनी कोरोना नियंत्रणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. दुसरी लाट ओसरू लागल्याने त्यांच्या प्रलंबित मागण्या दूर कराव्यात, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना केली होती. कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी कागदपत्रांची अडचण येत होती. दि. ११ व १२ सप्टेंबर रोजी सुटी असताना कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बोलावून हे काम मार्गी लावण्यात आले. आरोग्यसहायक : १८, आरोग्यसहायिका : ४२, आरोग्य पर्यवेक्षक : ७ अशी पदे रिक्त आहेत. यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील, उत्कर्ष इंगळे, अनुपमा पडवळे, सहायक शामेल अडाकुल यांनी परिश्रम घेतले.
कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
१४२ कर्मचा-यांना सेवाअंतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी लागणारी माहिती संकलित करण्यात आली असून सप्टेंबरअखेर सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येतील. आतापर्यंत आरोग्यसेविका : १३० आरोग्यसेवक :११०, आरोग्यसहायक : ५६, औषध निर्माण अधिकारी : २० इतक्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी