दिलासादायक बातमी; सोलापुरात कोरोनातून बरे होण्याचा दर ५४.६४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:38 AM2020-07-03T10:38:32+5:302020-07-03T10:42:35+5:30
३६ टक्के रुग्णांवर उपचार; प्लाझ्मा थेरपी, अँटीजेन टेस्टचाही होणार लाभ
सोलापूर : शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ५४.६४ टक्के बाधित या आजारातून बरे झाले आहेत. तर साधारणपणे ३६ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळपास १० टक्के इतके आहे. तर या आजारातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार ७२७ इतके कोरोनाचे रुग्ण असून एक हजार ४९० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २७३ जणांचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आजाराचा पहिला रुग्ण हा १२ एप्रिल रोजी आढळला. त्यापूर्वी एक महिना आधी १२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये फीव्हर ओपीडी सुरु करण्यात आली. येथे २४ तास स्क्रीनिंग सुरु असून आत्तापर्यंत १७ हजार ७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. संशयितांना क्वारंटाईन, कोरोना आजार असलेल्यांना आयसोलेट करण्यात आले तर कोरोना आजार नसलेल्या नागरिकांना घरी पाठवले.
शहर व जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण सुरू असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना आजाराचे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येणे शक्य होईल.
पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटर
सिव्हिल रुग्णालयाला पीएम केअर फंडातून नऊ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. सिव्हिलकडे यापूर्वी १८ व्हेंटिलेटर होते, आता यात वाढ होऊन व्हेंटिलेटरची संख्या २७ होणार आहे. यामुळे अतिगंभीर रुग्णांचे अधिक चांगले उपचार करणे शक्य होईल. तंत्रज्ञामार्फत हे व्हेंटिलेटर रुग्णालयात बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रेमडीसीवीर, टोसिलोझुमॅब, फॅव्हीपीरॅवीर या नव्या औषधांचा वापर सिव्हिलमध्ये करण्यात येत आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीची सुरुवात ही करण्यात आली असून यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढणार आहे.
रुग्ण बरा होण्याचा दर वाढवता येणे शक्य आहे. यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, फक्त गरजेच्या वेळीच घराबाहेर पडणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला घसा दुखणे असे त्रास झाल्यास त्वरित तपासणी करुन घ्यायला हवी. कोरोनाने मृत झालेल्या ७२ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि हृदयाचे विकार होते. हे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेऊन रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकतात.
- डॉ. राजेश चौगुले, सहायक वैद्यकीय अधीक्षक, जनऔषध वैद्यकशास्त्र तज्ज्ञ