दिलासादायक बातमी; सोलापूर शहरातील २४ कोविड रुग्णालयात एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 02:43 PM2021-06-04T14:43:24+5:302021-06-04T14:43:29+5:30
नऊ रुग्णालयात फक्त एक रुग्ण : एकूण १८२६ बेड रिक्त
सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील ६६ रुग्णालयांपैकी २४ रुग्णालयात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. या २४ रुग्णालयात कोरोनासाठीचे ५३३ बेड रिक्त आहेत.
शहरामध्ये मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यादरम्यान गंभीर रुग्णांना खासगी व शासकीय कोविड रुग्णालयांत बेड उपलब्ध होत नव्हते, परंतु आता कोरोना नियंत्रणात आल्याने मे महिन्यापासून रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. जून महिन्याच्या पहिल्या सुरुवातीस तर कोविड उपचारासाठी असलेल्या २४ रुग्णालयात एकही रुग्ण नाही.
सोलापूर शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सरकारी व खासगी असे दोन्ही मिळून ६६ रुग्णालये आहेत. यात कोरोनासाठीचे दोन हजार ६९१ बेड असून त्यापैकी एक हजार ८२६ बेड रिक्त आहेत.
२२ रुग्णालयात १० पेक्षा कमी रुग्ण
शहरातील २२ रुग्णालयात १० पेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहेत. या २२ रुग्णालयात सध्या फक्त ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर या २२ रुग्णालयात ५८० बेड आहेत. शहरातील ९ रुग्णालयात फक्त एकच रुग्ण उपचार घेत आहे.
शहरातील कोविड रुग्णालयाची स्थिती
- कोविड बेड - २६९१
- उपचार घेणारे रुग्ण - ७०१
- कोरोना संशयित रुग्ण - १६४
- उपचार घेणारे एकूण रुग्ण - ८६५
- रिक्त बेड - १८२६