चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरात येताय? असा आहे नियोजित मार्ग!
By संताजी शिंदे | Published: March 28, 2023 07:07 PM2023-03-28T19:07:45+5:302023-03-28T19:07:56+5:30
पोलिस अधिक्षकांनी काढले आदेश : ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत राहणार बदल
सोलापूर : चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील व बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हा बदल ३० मार्च ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत राहणार आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यात्रे निमित्त पंढरपूरात अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, तीन रस्ता मोहोळ रोड मार्ग विसावा येथे पार्क करावीत. ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळीमार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व येथे पार्कींग करावीत.
पंढरपूर शहरातीलअंतर्गत वाहतूक प्रदक्षिणा मार्ग, महाव्दार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कार्नर ते नगरपालिका, भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा पासेच्या वाहना व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.