आयुक्त गुडेवार आज रुजू होणार
By admin | Published: May 8, 2014 10:44 AM2014-05-08T10:44:02+5:302014-05-08T10:44:11+5:30
नगरसेवकांमुळे नाराज झालेले सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे आज पुन्हा सेवेत रुजू होणार आहत.
जनतेच्या लढ्याला यश : सोलापूर बंदला प्रतिसाद, प्रधान सचिवांची सरंक्षण देण्याची भाषा
सोलापूर : महापालिकेचे धडाकेबाज आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनासाठी शहरात सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी यश आले़ नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी आयुक्तांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देऊ़ तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आणि रुजू व्हा, असे सांगितल्याने गुडेवार गुरुवारी दुपारी महापालिकेची पुन्हा सूत्रे स्वीकारणार आहेत़ बुधवारी आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर बंदची हाक देण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालयावर पाच विविध ठिकाणांहून मोर्चे काढण्यात आले़ गर्दी कमी असली तरी प्रमुख बाजारपेठा बंद होत्या़ दुपारी आयुक्त गुडेवार यांनीच आपण पुन्हा गुरुवारी महापालिकेत रुजू होत असल्याचे जाहीर केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले़ काँग्रेस नगरसेवकांनी सोमवारी दुपारी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करीत ‘पाणी द्या, नाही तर खुर्ची खाली करा’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे गुडेवार यांनी अवघ्या पाचच मिनिटांत शासनाला पत्र पाठवून पदभार सोडला आणि आंदोलनकर्त्यांच्या हातात पत्र दिले होते़ चांगल्या अधिकार्यासाठी शहरातील लोक रस्त्यांवर उतरले. युवा संघटना, बिगर राजकीय संघटना यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलने करीत गुडेवार यांना पाठिंबा दिला़ कुठे सह्यांची मोहीम तर कुठे मोर्चे, कुठे काळ्या फिती लावल्या तर कुठे रास्ता रोको केला़ शहरातील वातावरण ढवळून निघाले़ (प्रतिनिधी)
सोलापूरकरांचा मी आभारी!
नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी मला महापालिकेत पुन्हा रुजू होण्याचे सांगितले़ त्यामुळे गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत मी महापालिकेत येऊन पुन्हा पदभार स्वीकारणार आहे़ सोलापूरकरांचे मी मनापासून आभार मानतो़ - चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त