सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेच्या पंचकमिटीला आयुक्तांनी ठणकावले, जनावर बाजार यंदा दुसरीकडे हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:51 PM2018-12-25T12:51:37+5:302018-12-25T12:52:39+5:30
सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वराच्या यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराच्या समोरील जागेत भरणारा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा. सध्या तरी मी या ...
सोलापूर : ग्रामदैवत सिध्देश्वराच्या यात्रेनिमित्त रेवणसिध्देश्वर मंदिराच्या समोरील जागेत भरणारा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलविण्यात यावा. सध्या तरी मी या जागेवर बाजार भरविण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी देवस्थान समितीला सांगितले आहे. यंदाच्या वर्षापुरते या जागेवर बाजार भरविण्यास परवानगी द्या, अशी विनंती समितीने आयुक्तांना केली आहे.
सिध्देश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या नियोजन आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांनी सोमवारी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली. होम मैदानाचे यंदा सुशोभीकरण झाले आहे. त्याला बाधा होऊ नये, अशी अट मनपा प्रशासनाने घातली आहे. मैदानाच्या सुशोभीकरणाला धक्का न लावता मैदानावर स्टॉल उभारण्यात येतील, अशी ग्वाही पंचकमिटीच्या सदस्यांनी दिली.
यंदा होम मैदानावर भाविकांना वाहने आणता येणार नाहीत. त्यामुळे नॉर्थकोट प्रशालेच्या मागील बाजूची जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने केली. देवस्थान समितीने होम मैदानावर स्टॉल उभारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा प्रशासन निर्णय घेणार आहे. या बैठकीस पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, काशीनाथ दगोर्पाटील, शिवकुमार पाटील, मल्लिकार्जुन कळके, डॉ. राजशेखर येळीकर व सुरेश फलमारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकºयांना जनावरे, पाणी व चाºयाअभावी सांभाळणे अवघड झाले आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांचा बाजार लवकरात लवकर भरावा, अशी सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्मार्ट सिटी प्रकल्पातून होम मैदानावर करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या कामाला कुठेही धक्का न लावता श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर मनोरंजनाची साधने व स्टॉल उभारण्यात येतील. या मैदानाचे सौंदर्य जपण्यासाठी यात्रेकरूंकडूनही सहकार्य अपेक्षित आहे.
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, देवस्थान पंचकमिटी
सध्याच्या स्थितीत तरी जुन्या जागेत जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी दिलेली नाही. दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि आमची बैठक होईल. त्या बैठकीनंतर निर्णय कळविला जाईल.
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका.