समिती ॲक्टिव्ह झाली अन् कोरोना आटोक्यात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:45+5:302021-06-09T04:27:45+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्यासह त्यांचे बंधू आणि चुलते या पाटील कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्यासह त्यांचे बंधू आणि चुलते या पाटील कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे पाटील कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली. अशातच गावात कोरोनाने जवळपास ८ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याने पहिल्या लाटेचा भोसे गावाला मोठा फटका सहन करावा लागला होता.
पहिल्या लाटेचे परिणाम लक्षात घेऊन सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी दक्षता बाळगून योग्य नियोजन केले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत आजपर्यंत २३५ रुग्णांचा आकडा लोकसंख्येच्या तुलनेत कमीच राहिला आहे. यापैकी २१७ जणांनी कोरोनावर मात केली. तर ५ व्यक्तींचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत गावात १० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील दोघे रुग्णालयात तर आठजण विलगीकरणात उपचार घेत आहेत.
अधिकाऱ्यांनी घेतल्या बैठका
भोसे गावाला मागील वर्षी जो फटका सहन करावा लागला, तो प्रसंग टाळण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दोनवेळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले. तहसीलदार सुशील बेल्हेकर, सपोनि प्रशांत पाटील यांनी वेळोवेळी स्थानिक समित्यांच्या बैठका घेऊन कोरोना रोखण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले.
कोट ::::::::::::::
पहिल्या लाटेत माझ्या कुटुंबासह गावाला फटका सहन करावा लागला. तो प्रसंग निर्माण होऊ नये यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नागरिकांची मोठी साथ लाभली. येथील रुग्णांना ऑक्सिजन लावण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व टीम प्रभावीपणे काम करीत आहेत. प्रशासनाकडून सहकार्य मिळत आहे.
ॲड. गणेश पाटील
सरपंच, भोसे