सोलापूरातील स्टेडियमच्या गाळ्यांचे भाडे ठरविण्यासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:34 AM2018-04-24T11:34:58+5:302018-04-24T11:34:58+5:30
महापौरांनी घेतलेल्या बैठकीत झाला निर्णय, सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणार
सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियममध्ये असलेल्या ३० गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. या गाळ्यांचे भाडे ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय स्टेडियम कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्टेडियम कमिटीची बैठक झाली. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह जिल्हा क्रीडाधिकारी, पोलीस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी बैठकीतील विषयांचे वाचन केले. यामध्ये स्टेडियमच्या बाहेर असलेल्या ३० गाळ्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधितांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
या गाळ्यांच्या भाडेवाढीच्या धोरणाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बाजारभावाप्रमाणे आढावा घेऊन भाडे ठरविण्यावर चर्चा झाली. पण बैठकीला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे उपस्थित नसल्याने महापौर बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून चर्चा करून निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
नॅबचे कार्यालय, रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याचा कार्यक्रम, जिल्हा बँकेने घेतलेल्या कार्यक्रमाचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. क्रीडासंबंधित कार्यक्रमांना सवलत देता येते. नॅबचे कार्यालय व जिल्हा बँकेचा कार्यक्रम यासंबंधी नसल्याने भाड्यात सवलत देता येणार नाही, असे चर्चेअंती ठरविण्यात आले. स्टेडियमवरील हिरवळ वाढविण्यासाठी बोअरला पंप बसवून पाण्याची सोय व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश
- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्टेडियमच्या सुरक्षेसाठी किती कर्मचारी आहेत, असा बैठकीच्या प्रारंभीच सवाल केला. क्रीडा अधिकारी शेख यांनी एक कर्मचारी असल्याचे सांगितल्यावर देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्टेडियमची भव्यता पाहता सुरक्षेसाठी कर्मचारी का नाहीत, असा सवाल केला. चर्चेअंती स्टेडियमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे ठरले.