मराठा विद्यार्थ्यांसाठी नेमली समिती, वसतिगृहासाठी होणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 09:01 PM2018-08-06T21:01:52+5:302018-08-06T21:09:48+5:30
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजश्री शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंमलबजावणीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली.
सोलापूर : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजश्री शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंमलबजावणीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी असून सचिव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र चितलांगे हे आहेत.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी संदर्भात ही समिती माहिती जाणून घेणार असून तसा अहवालही शासनाकडे सादर करणार आहे. तसेच मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर सुरू करावयाच्या वसतिगृहासाठी इमारतीची पहाणी करण्याच्या सूचनाही या समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याच्या दृष्टीने महिनाभरात निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही समिती सोलापूर शहरातील चार इमारतींची पाहणी करून वसतिगृहासाठी इमारत निश्चित करणार आहे.