सोलापुरात संचारबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार
By appasaheb.patil | Published: April 19, 2020 10:03 PM2020-04-19T22:03:50+5:302020-04-19T22:59:08+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश; कोरोना बाधित रुग्ण वाढल्याने प्रशासनाने घेतला निर्णय...
सोलापूर : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारी दुसरा बळी गेला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारी दुपारी दोन ते गुरुवारी रात्री १२ पर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.
या काळात केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने आणि पोलिस दलाचे काम सुरू राहणार आहे. शहरातील सर्व आस्थापना व शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे बँका, इतर सरकारी कार्यालय बंद असणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
कोरोना प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून अन्य व्यक्तीला होण्याची शक्यता आहे त्यामुळे संचार बंदीचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. यांना आदेश लागू नसेल अत्यावश्य सेवा पुरवणारे खासगी, सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांची वाहने, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने, पाणी पुरवठा, अग्निशामक, विद्यूत पुरवठा, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे आदेश लागू नाहीत. सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध वाटप व विक्री करता येईल. शहरातील पेट्रोल पंप सकाळी सात ते ११ या वेळेत सुरू राहतील. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलिस यांना पेट्रोल, डिझेल मिळेल.