सोलापुरातील लोकमंगल फाऊंडेशनचा २१ नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 04:25 PM2021-10-14T16:25:01+5:302021-10-14T16:25:07+5:30
विवाह नोंदणीसाठी उभारणी २५ ठिकाणी माहिती केंद्रे
सोलापूर ; लोकमंगल फाऊंडेशन आयोजित सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून २१ नोव्हेंबर रोजी गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयात होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संचालक अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे विवाह सोहळ्याचे १६ वर्ष असून आजवर लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने २९८१ जोडप्यांचे विवाह झाले आहेत. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र, जोडवे, संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार आहेत.
विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन केले जाणार आहे. या विवाह सोहळ्यास सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या नातेवाईकांनी लोकमंगल फाऊंडेशनच्या होटगी नाका येथील कार्यालयात नावनोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा, विवाह सोहळ्याच्या माहितीसाठी लोकमंगल पंतसंस्था, लोकमंगल हॉस्पिटल, लोकमंगल कारखान्यासह जवळपास २५ ठिकाणी माहिती केंद्र उभारण्यात आल्याचेही महागावकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शशी थोरात उपस्थित होते.