कामतीच्या रास्तधान्य दुकानदाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:04+5:302021-06-19T04:16:04+5:30
मोहोळ : कामती बुद्रूक येथील रास्त भाव धान्य दुकान गेल्यावर्षी अनागोंदी कारभाराच्या तक्रारीनंतर निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुरवठा कार्यालयाने ...
मोहोळ : कामती बुद्रूक येथील रास्त भाव धान्य दुकान गेल्यावर्षी अनागोंदी कारभाराच्या तक्रारीनंतर निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुरवठा कार्यालयाने पुन्हा परवाना दिल्याचे निदर्शनास आले आहे.
पुरवठा कार्यालयाच्या या प्रकाराविरोधात कामतीतील काही सर्वसामान्य नागरिकांनी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली.
सर्वसामान्यांच्या या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कार्यालयात बोलवून कामती येथील रास्त भाव धान्य दुकान निलंबित करण्याच्या सूचना केल्या.
गेल्या कित्येक वर्षांपासून कामतीचे रास्त भाव धान्य दुकानदाराकडून पिळवणूक सुरू होती. तसेच काही वस्तू बळजबरीने सर्वसामान्यांच्या माथी मारल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने मागील वर्षी तक्रार केली होती. प्रांताधिकारी सचिन ढोले व मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडेही तक्रारी आल्या आणि हे दुकान निलंबित करण्यात आले होते. हे दुकान पुन्हा निलंबित व्हावे यासाठी जनहितसोबत सर्वसामान्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
या शिष्ठमंडळात प्रवीण भोसले, अल्ताफ शेख, महेश ढेकळे, युवा कारंडे, शिवाजी भोईटे, पापा पवार, महिला विटाबाई कांबळे, पद्मिनी ढेकळे, सुनीता रणदिवे सहभागी झाले होते.
---
फोटो : १८ कामती
कामतीतील धान्य दुकानाचा परवाना निलंबित केले जावे मागणीसाठी सर्वसामान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडल्या.