मुंढेवाडीत खुली घरजागा चोरीला गेल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:16+5:302021-06-22T04:16:16+5:30
अक्कलकोट : ६० बाय २० खुली घरजागा चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज मुंढेवाडी येथील शिवानंद धोंडप्पा कोळी यांनी चार ...
अक्कलकोट : ६० बाय २० खुली घरजागा चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज मुंढेवाडी येथील शिवानंद धोंडप्पा कोळी यांनी चार दिवसांपूर्वी अक्कलकोट पंचायत समिती कार्यालयात दिला आहे. या तक्रारीनंतर मुंढेवाडी (ता. अक्कलकोट) तील सर्वसामान्यांतून नवल व्यक्त हाेत आहे.
मुंढेवाडी ग्रामपंचायत दप्तरी शिवानंद कोळी यांच्या नावे ही जागा नोंद दर्शविते. ११९२ पूर्वीपासून आजही जागेचा उतारा कोळी यांच्या नावे निघतो आहे. याबाबत त्यांनी ग्रामसेवक आमसिद्ध जमादार यांच्याकडे तक्रार केली. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही.
तसेच कोळी यांनी शेजारील रहिवासी माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश आप्पाराव पाटील यांच्याविरुद्ध साऊथ पोलीस ठाण्यात जागेसंबंधी तक्रार दिली होती. दरम्यान, पाटील यांनी वादग्रस्त जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणार नाही. जोपर्यंत जागेचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत या जागेवर कोणाचाही वावर नसेल, असा लेखी जबाब १५ जून २१ रोजी दिला होता. कोळी यांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत तक्रार दिली आहे.
--
जागा एक, उतारे दोन
या जागेचा क्रमांक पूर्वी १३ होता. आता तो २४ झाला आहे. तक्रारदार कोळी यांच्या नावाने आजही उतारा निघत आहे. मात्र त्याच जागेचा उतारा रमेश पाटील यांच्याही नावे निघत आहे. पाटील यांच्या उताऱ्यावर शेरा या ठिकाणी काहीच लिहिलेले नाही. रजिस्टरमध्ये खाडाखोड झाल्याचे दिसत आहे. कोळी अनेक वर्षांपासून त्या जागेचा कर भरत आहेत. २१ डिसेंबर २०२० रोजीचा उतारा पाहता कोळी यांच्यानावे ३० वर्षांपूर्वीपासून आजही उतारा निघत आहे.
--
मी पदभार घेण्यापूर्वीचा हा विषय आहे. याबाबत काही माहिती नाही. कोळी यांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दिली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई होईल.
- आमसिद्ध जमादार
ग्रामसेवक, मुंढेवाडी
----
फोटो : २१ मुंढेवाडी
मुंढेवाडी येथील वादग्रस्त जागेत बांधकाम सुरू आहे.