कोरोना रुग्णाकडून सव्वा लाखाचे बिल घेतल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:22 AM2021-05-10T04:22:14+5:302021-05-10T04:22:14+5:30
अर्जुन भीमराव रोकडे (रा. फिसरे) केएमजी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. ऑक्सिजन बेड म्हणून ...
अर्जुन भीमराव रोकडे (रा. फिसरे) केएमजी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. ऑक्सिजन बेड म्हणून १ लाख ३७ हजार ५०० रुपये बिल देण्यात आले शिवाय मेडिकलच्या औषधांचे पैसे वेगळे घेण्यात आले. ऑक्सिजन फक्त तीन ते चार दिवस लावला होता. हे बिल प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यामुळे संबंधित रुग्णाचे नातेवाईक हनुमान रोकडे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे तक्रार केली.
चिवटे यांनी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा तपासणी अधिकारी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी यांच्याकडे तक्रार केली. तहसीलदार समीर माने यांनाही याबद्दल माहिती दिली.
बिलाची रक्कम दिल्याशिवाय संबंधित हॉस्पिटल रुग्णाला सोडत नसल्यामुळे वाद वाढू लागला. हे प्रकरण आता शिवसेनेनेमार्फत तहसीलदारांकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर त्या डाॅक्टरांनी तडजोडीची भूमिका घेऊन एक लाख दहा हजार रुपये घेऊन रुग्णाला सोडून दिले. यासाठी एका सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
ऑक्सिजन बेडला प्रतिदिन ४ हजार रुपये खर्च द्यावा, असे शासनाचे आदेश आहेत या चार हजार रुपयांमध्ये एक्स-रे, रक्ताच्या चाचण्या, डॉक्टर तपासणी, नर्स, स्वच्छता या सर्व सेवा समाविष्ट आहेत.
डॉक्टर अधिकृत बिल देत नाहीत मेडिकल दुकानदार अधिकृत बिल देत नाही. एक लाख दहा हजार रुपये घेऊन सुद्धा बिल दिलेले नाही. एखाद्या रुग्णाला विमा मिळवायचा असेल तर बिलाची गरज असते तरी या बिलाची पूर्ण तपासणी करून उर्वरित रक्कम रुग्णाला द्यावी, अशी मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.
बिलाचे ऑडिट करण्याची मागणी
१ लाख ३७ हजार ५०० रुपये बिल दिल्यानंतर आम्ही अधिकृत बिलाची मागणी केली. ते बिल आम्हाला डॉक्टरांनी दिले नाही. एका कागदावर फक्त आकडा लिहून दिला शिवाय बिल न दिल्यास रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे तक्रार केली. रुग्ण घरी जायची घाई करत असल्यामुळे आम्ही नाईलाजाने १ लाख १० हजार रुपये देऊन रुग्ण घरी घेऊन गेलो, पण ही रक्कम जास्त असून संबंधित बिलाचे ऑडिट करून उर्वरित रक्कम त्या रुग्णाला परत द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- हनुमंत रोकडे,
सदस्य ग्रामपंचायत, फिसरे
कोट ::::::
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- दिलीप तिजोरे,
अध्यक्ष, रुग्णालय बिल तपासणी समिती
कोट ::::::::
बाधित रुग्णावर ११ दिवस ऑक्सिजन उपचार केले. तो रुग्ण बरा झाला आहे. आकारणी केलेले बिल योग्य असून आम्ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून रुग्णावर उपचार केले आहेत.
- डॉ. सत्यनारायण गायकवाड,
करमाळा