घरकुल बांधकाम पूर्ण करण्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुके राज्याच्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:45 PM2018-08-24T12:45:37+5:302018-08-24T12:47:35+5:30
सोलापूर : सर्व प्रकारच्या घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात राज्यातील पहिल्या १० तालुक्यात माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा हे तालुके असून माळशिरस तालुका राज्यात दुसºया क्रमांकावर आहे.
पंतप्रधान आवास, रमाई आवास, शबरी व पारधी अशा चार प्रकारे घरकुले मंजूर केली जातात. जिल्हा परिषद स्तरावरील प्रकल्प संचालकाकडून घरकुलांचे उद्दिष्ट तालुक्यांना वाटप केले जाते. तालुक्यांना घरकुलांचे उद्दिष्ट दिल्यानंतर पंचायत समितीवर घरकुलांची बांधकामे करण्याची जबाबदारी पडते.
ज्या पंचायत समितीमध्ये घरकुलांच्या कामाची जबाबदारी असते त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसारच घरांची कामे सुरू व पूर्ण होतात. याबाबत पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्य तसेच गटविकास अधिकाºयांचाही पाठपुरावा तेवढाच महत्त्वाचा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टातील घरांची कामे पूर्ण केल्यानेच ही तालुके राज्याच्या पहिल्या १० तालुक्यात आली आहेत. माळशिरस पंचायत समितीने ५१३ घरकुले पूर्ण करुन राज्यात दुसरा, उत्तर तालुक्याने ४४१ घरकुले पूर्ण करून राज्यात सहावा तर करमाळा पंचायत समितीने ४१५ घरकुलांची कामे पूर्ण करून राज्यात ८ वा क्रमांक मिळविला आहे.
नाशिकचा शहापूर राज्यात प्रथम
- पहिल्या १० तालुक्यात नाशिक जिल्ह्यातील तीन, साताºयातील कराड, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पालघर तालुक्यातील डहाणू व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांचा समावेश आहे. शहापूर पंचायत समितीने ५५६ घरांची कामे पूर्ण करून राज्यात प्रथम,नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तिसरा, निफाड व बागलान हे तालुके अनुक्रमे ९ व्या व १० व्या क्रमांकावर आहेत, डहाणू चौथा, कराड पाचवा व शिरपूर हे तालुके ७ व्या क्रमांकावर आहेत.
वाळूची मोठी अडचण असताना घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. ग्रामपंचायतींवर आलेली जबाबदारी सरपंच, अन्य पदाधिकारी व ग्रामसेवकावर येते. ती जबाबदारी सर्वांनी पार पाडल्याने उत्तर तालुक्यातील घरकुलांची कामे मार्गी लागली.
- शंकरराव इंगळे,
अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना