प्रलंबित कामे पहिल्यांदा पूर्ण करा; आठ दिवसाचा खंड भरून काढा, अधिकाऱ्यांचे आदेश
By संताजी शिंदे | Published: March 21, 2023 03:35 PM2023-03-21T15:35:59+5:302023-03-21T15:36:37+5:30
अधिकाऱ्यांनी केल्या सूचना: मार्च अखेरमुळे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी ही करणार काम
सोलापूर : जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला संप मागे घेतल्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे पहिल्यांदा पूर्ण करा, गेल्या आठ दिवसाचा खंड भरून काढा अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. कर्मचारी कामाला लागल्या असून मार्च अखेरमुळे सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात काम करणार आहेत.
जुनी पेन्शन सह विविध मागण्यासाठी १४ मार्च रोजी पासून शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यभरात सर्वत्र आंदोलन सुरू होते, त्याचप्रमाणे सोलापुरात जिल्हा परिषदे जवळ पुनम गेट समोरही आंदोलन झाले. तब्बल सात दिवस सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळच्या सुमारास मागे घेण्यात आले. मंगळवारी महसूल विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अन्नधान्य पुरवठा विभाग, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, गृह विभाग, रोजगार हमी योजना, पुनर्वसन विभाग, जिल्हा निवडणूक कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, उपविभागीय अधिकारी क्र.१ व २, ग्रामपंचायत निवडणूक कार्यालय, गौण खनी कर्म विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, मत्स्य विभाग, सिटीसर्वे, कृषी विभाग अधिकाऱ्यालयांमध्ये सर्वत्र वर्ग ३ व ४ संवर्गातील कर्मचारी अधिकारी कामावर रुजू झाले होते. यामध्ये पदोन्नतीने गेलेल्या वर्ग २ मधील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.