भीमा नदीपात्रावरील दुहेरी रेल्वे मार्गावरील सेतूची उभारणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 03:20 PM2020-08-08T15:20:46+5:302020-08-08T15:23:10+5:30
रेल्वे मंत्र्यांनी केले काम पूर्ण झाल्याचे फोटो ट्विट; होटगी ते लच्याणपर्यंत ६७० मीटरचा पूल
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी जंक्शनपासून कर्नाटकातील इंडी तालुक्यातील लच्याण या दुहेरी रेल्वे मार्गादरम्यान असलेल्या भीमा नदीच्या पात्रावरील ६७० मीटर लांबीचा रेल्वे सेतू उभारण्याचे काम पूर्ण झाले़ या सेतूच्या दोन फोटोंसह रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करणारे ट्विट गोयल यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून केले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागातील हा सर्वात मोठा रेल्वे पूल असल्याचा देखील पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीजवळील फताटेवाडी येथे सुपर पॉवर थर्मल प्रोजेक्ट (एनटीपीसी) प्रकल्प सुरू असून, विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील कुडगी येथेही एनटीपीसी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी लागणारा कच्चामाल आणि या प्रकल्पाला गती देण्याबरोबरच दोन्ही राज्यातील आर्थिक आणि प्रवासी मालवाहतुकीची सोय व्हावी, यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०१४ ते २०१५ या वर्षात होटगी जंक्शन ते गदग या रेल्वे दुहेरी करण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. दरम्यान, होटगी जंक्शन ते लच्याण या ३६ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वे मार्गात भीमा नदी असून, या नदीपात्रावर नव्याने ६७० मीटरचा सेतू उभारण्यात आला आहे.
---------------
आॅक्टोबरनंतर धावणार रेल्वे...
होटगी-लच्याण या मार्गातील ६७० मीटरच्या नव्याने उभारलेल्या सेतूवर दोन मार्ग उभारले जात असून, यात सेतूवरील एका मार्गाचे काम पूर्ण झाले आहे़ यात या मार्गावरून रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे, पुलावरील आणखी एक मार्ग वाहतुकीसाठी सेतूचे काम येत्या आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे़ याशिवाय रेल्वे दुहेरीकरणाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले.
---------------
दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा रस्ता
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागातील हा सर्वात मोठा रेल्वे पूल असल्याचा देखील पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कुडगी ते गदग या दीडशे किलोमीटरच्या रेल्वे दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा विजयपूर-सोलापूर रेल्वे मार्ग हा खूप महत्त्वाचा असून, या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
-----------
९९६ कोटी रुपयांचा आला खर्च
मध्य व साऊथ रेल्वे विभागातील या महत्त्वाच्या पूल उभारणीस भारतीय रेल्वे मंत्रालयाने २०१४-२०१५ साली मंजुरी दिली होती़ या दुहेरीकरणाच्या कामासाठी ९९६ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यासाठी हजारो कर्मचारी व शेकडो अधिकाºयांनी दिवसरात्र परिश्रम घेतल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले़ आॅक्टोबरनंतर अंतिम चाचणी घेतल्यावर या पुलावरून रेल्वे धावणार असल्याचेही यावेळी सांगितले.