पाणीपुरवठ्याचा १४४१ कोटींचा सर्वंकष आराखडा एकमताने मंजूर
By admin | Published: May 14, 2014 01:15 AM2014-05-14T01:15:38+5:302014-05-14T01:15:38+5:30
मनपा सभा: टाकळी समांतर जलवाहिनीचा १६७ कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव पुन्हा येणार
सोलापूर: शहराची सन २०४६ पर्यंतची संभाव्य २२ लाखांची लोकसंख्या गृहीत धरुन २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी तज्ज्ञ अभियंते राजेंद्र होलाणी यांनी तयार केलेला १४४१ कोटींचा सविस्तर प्रकल्प आराखडा मनपा सभेत एकमताने मंजूर करण्यात आला़ या सभेत होलानी आणि आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कामाचे कौतुक करीत अभिनंदनाचे ठराव करण्यात आले़ महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केली होती़ तत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता पाणीपुरवठ्याची कार्यशाळा आयोजित केली होती़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त तज्ज्ञ अभियंते राजेंद्र होलानी यांनी शहराचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला़ हाच आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने मनपा सभेपुढे ठेवला होता़ सत्ताधारी आणि विरोधकांनी या आराखड्याला एकमताने मंजुरी दिली़ आता हा आराखडा केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयुआरएम) योजनेसाठी पाठविण्यात येणार आहे़ त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या या आराखड्याला महापालिकेला ८० टक्के केंद्राचे तर १० टक्के राज्य शासनाचे अनुदान मिळणार आहे़ मनपाला केवळ १० टक्के हिस्सा घालावा लागणार आहे़ या १४४१ कोटींच्या आराखड्यामध्ये एनटीपीसीकडून केल्या जाणार्या उजनी ते सोलापूर या २५४ कोटींच्या समांतर जलवाहिनीचा समावेश आहे़ शिवाय टाकळी ते सोलापूर ही समांतर १६७ कोटींची जलवाहिनी टाकणे, हिप्परगा येथे २४ कोटी खर्चून २७ दशलक्ष लिटर्स पाणी घेण्याची क्षमता निर्माण करणे, उजनी ते सोलापूर तिसरी समांतर जलवाहिनी टाकणे, सर्व नळांना मीटर बसविणे आदी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत़ यावेळी महेश कोठे, मनोहर सपाटे, जगदीश पाटील, आनंद चंदनशिवे, अॅड़ यु़ एऩ बेरिया आदींनी भाषणे केली़ दोन तासांची कार्यशाळा आणि दोन तास मनपा सभागृहात फक्त पाणीपुरवठ्यावरच चर्चा झाली़ प्रत्येकाने आपल्या भाषणात गुडेवारांच्या कार्याचे कौतुक केले़ तुम्ही एक नव्हे पाच वर्षे राहा, असे बेरिया म्हणाले़ चांगल्या कामाला आम्ही कुणीही मध्ये येणार नाही, असे कोठे म्हणाले तर आयुक्तसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे सपाटे म्हणाले़
------------------------
समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव लांबणीवर टाकळी ते सोलापूर ही जलवाहिनी जुनी झाली आहे़ १६७ कोटी खर्चून समांतर जलवाहिनी टाकल्यास जुन्या आणि नव्या जलवाहिनीतून १०८ दशलक्ष लिटर्स पाणी घेणे शक्य होणार आहे़ केंद्राकडे पाठविण्याच्या १४४१ कोटींच्या आराखड्यात या कामाचा समावेश आहे़ मात्र शहराची पाणीटंचाई लक्षात घेता हे काम ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के मनपा हिस्सा या धर्तीवरील राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेत पाठविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता़ मात्र दोन्ही ठराव वेगवेगळे असावेत, त्यामुळे १६७ कोटींचा टाकळी-सोलापूर जलवाहिनीचा सविस्तर प्रस्ताव पाठवा, अशी सूचना पक्षनेते महेश कोठे यांनी केली. सभागृहात सर्वानुमते हा ठराव करण्यात आला़ त्यामुळे तूर्तास समांतर जलवाहिनीचा विषय लांबणीवर पडला आहे़
------------------------------------------
होलानी यांच्या सादरीकरणाला दाद पाणीपुरवठ्याबद्दल होलानी यांनी केलेल्या सादरीकरणाला नगरसेवकांनी दाद दिली़ खूप अभ्यासपूर्ण आणि कष्ट घेऊन प्रकल्प आराखडा तयार केला, त्यामुळे सभागृहात त्यांचा तसेच चिकाटीने काम करणार्या आयुक्त गुडेवार यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला़ हिप्परगा, उजनी, भीमा आदी योजनांची सद्यस्थिती, त्यांचा इतिहास आणि काय केले तर काय होऊ शकते याचे अभ्यासपूर्ण विवेचन होलानी यांनी केले़ नगरसेवकांच्या प्रश्नांनादेखील त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली़
--------------------------------------------------------
भरकटलेली सभा अन् बोलाचीच भाषणे सभेतील विषय एक अन् भाषणबाजी दुसरीकडे असे भरकटलेले चित्र मंगळवारी झालेल्या मनपा सभेत पाहायला मिळाले़ त्यामुळे कधी मोदी सरकार येणार म्हणून शेरेबाजी तर कधी सुशीलकुमार शिंदेच जिंकणार, तुम्ही मला १६ तारखेला फोन करा, अशी आव्हाने देणारी भाषणे यामुळे पाण्यावर पाच ते सहा तास चर्चा होऊनही महत्त्वाचे विषय निर्णयाअभावी लटकले़ टाकळी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव आयुक्तांनी मनपा सभेपुढे पाठविला होता़ ५ मे रोजी सभेच्या अजेंड्यावर विषय होता, मात्र त्याच दिवशी सभा झाली नव्हती़ हीच सभा मंगळवारी सायंकाळी आयोजित केली होती़ तत्पूर्वी दोन वाजता पाण्यावर कार्यशाळा आयोजित केली होती़ प्रत्यक्षात कार्यशाळा सुरू व्हायला चार वाजले़ सुरुवातीला ड्रेनेज योजनेच्या ३२१ कोटींच्या आराखड्याबद्दल माहिती देण्यात आली़ त्यानंतर राजेंद्र होलानी यांनी २४ तास पाणीपुरवठ्याबद्दल केलेल्या १४४१ कोटींच्या सविस्तर आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले़ नगरसेवकांच्या सर्व शंकांचे होलानी यांनी निरसन केले, तरीही पुन्हा सभा सुरू झाल्यावर त्याच नगरसेवकांनी भाषणबाजी सुरू केली़ सपाटे म्हणाले, आयुक्तांनी मैदान सोडून जाण्याची गरज नव्हती़ गुडेवार साहेब तुम आगे बढो, आम्ही सर्व पक्ष तुमच्या पाठीशी आहोत, बेरिया यांनीही आयुक्तांच्या कामांचे कौतुक करीत पाच वर्षे राहावे, अशी मागणी केली़ जगदीश पाटील यांनी मोदी सरकारकडे पाणीपुरवठ्याचा विषय नेला तर सपाटे सुशीलकुमार शिंदे विजयी होणारच, हे जाहीर केले़ कोठे यांनी शहरात नक्की काय नाटक झाले, हे समजले नाही असे म्हणताच नागरिकांनी विविध आंदोलने केली़ शहर बंद केले हे नाटक होते काय, असा सवाल केला़ पाण्यापेक्षा राजकारणावर अधिक चर्चा झाली़ त्यामुळे विषयांतर झाले़
-------------------------------------
हे प्रस्ताव लटकले ४केगाव येथे १०० कोटी रुपये खर्चून थीम पार्क आणि अॅम्युजमेंट पार्क उभारण्यासाठी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याकडून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला मात्र त्याला सभेत मंजुरी मिळाली नाही़ ४ई- गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क यांनी १७़५९ कोटींचा आराखडा तयार केला असून त्याला केंद्राकडून ५० टक्के, राज्याकडून २० टक्के अनुदान मिळू शकते मात्र प्रस्ताव मंजूर झाला नाही़
--------------------------------------
टाकळी ते सोलापूर ही समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १६७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे़ सभेने मंजुरी दिल्यानंतर वर्षभरात ही जलवाहिनी पूर्ण करण्याचे ध्येय आहे़ शिवाय जुन्या जलवाहिनीवर बीपीटी बांधण्याचे काम हाती घेतले आहे़ ही दोन्ही कामे झाली तरीही शहराला दररोज पाणीपुरवठा देऊ शकतो़ - चंद्रकांत गुडेवार आयुक्त