संगणक परिचालकांनो ई-ग्रामचे काम पूर्ण करा, सोलापूर जि़प़ चे सीईओ राजेंद्र भारूड यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:56 AM2018-04-15T11:56:28+5:302018-04-15T11:56:28+5:30
जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे.
राकेश कदम
सोलापूर: आपले सरकार सेवा केंद्रांना दिलेले ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. परंतु, या सॉफ्टवेअरच्या आधारे जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. सॉफ्टवेअरच्या वापरात काही अडचणी असतील तर त्या दूर करू. एप्रिलअखेरसर्वच ग्रामपंचायतींमधील नोंदी पूर्ण करून घेऊ, असेही प्रशासनाने सांगितले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचे दाखले संगणकीकृत प्रणालीद्वारे दिले जाणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील १ ते ३३ प्रकारच्या नोंदवह्यांतील हस्तलिखितांच्या नोंदी ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये भरून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे प्रशासन ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून हे काम करून घेत आहे. १ एप्रिलपासून हस्तलिखित नोंदी बंद करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. यादरम्यान, ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत नोंदी पूर्ण करणार नाही, असे निवेदन राज्य संगणक परिचालन संघटनेने ग्रामसचिवांना दिले आहे. त्यामुळे हे काम ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शासन निर्देशानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्याचा दावा केला आहे. काही जिल्ह्यात संगणक परिचालकांच्या वेतनाच्या अडचणी आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वप्रथम वेतनाचा विषय मार्गी लावला आहे. त्यामुळे परिचालकांनी कामे तातडीने सुरू करावीत, असे आवाहनही प्रशासन करीत आहे.
विरोध कामाला की सॉफ्टवेअरला ?
च्संगणक परिचालक संघटनेच्या आरोपामागे राजकारण असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकाºयांमार्फत आहे. परिचालकांचा विरोध कामाला की सॉफ्टवेअरला हे प्रथम निश्चित झाले पाहिजे. जे काम करणार नाहीत त्यांना घरी बसविण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणींसाठी समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांशी चर्चा करून अडचणी सोडवून घ्या आणि कामाला सुरुवात करा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी १९३ ग्रामपंचायतींमधील नोंदींचे काम पूर्ण झाले आहे. ३० ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकाºयांना काम पूर्ण झाल्याचे पत्रही दिले आहे. या ग्रामपंचायतींकडील दफ्तर पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणींबाबत जिल्हा समन्वयकांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न व्हावा.
-चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जि. प. सोलापूर.
शासनाच्या निर्देशानुसार ई-ग्राम सॉफ्टवेअरचे काम करून घेत आहोत. या कामात काही अडचणी असतील तर त्या शासन स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर.
शासनाच्या निर्देशानुसार ई-ग्राम सॉफ्टवेअरचे काम करून घेत आहोत. या कामात काही अडचणी असतील तर त्या शासन स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
-डॉ. राजेंद्र भारुड,
मुख्य कार्यकारी
अधिकारी, जि. प. सोलापूर.