पालखीऐवजी रथ ठेवण्याची पंच कमिटीची संकल्पना; यंदाही चार प्रमुख विधी वेळेत; मानकरी हिरेहब्बूंचा शब्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:57 AM2020-01-02T10:57:44+5:302020-01-02T11:00:09+5:30
सोलापूर सिद्धेश्वर यात्रा : होम विधीसाठी सातही नंदीध्वज मैदानावर लवकर आणण्याची बनशेट्टी यांची सूचना
सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील मिरवणुकीत पालखी धरणाºयांच्या मानसिकतेचा विचार करून पुढील अथवा त्या पुढील वर्षांपासून सोन्याचा मुलामा असलेला रथ ठेवण्याची संकल्पना पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मांडली तर यंदाही यात्रेतील चार प्रमुख सोहळे वेळेतच पार पडतील, असा शब्द मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी देताच ‘बोला...बोला... एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र... सिद्धेश्वर महाराज की जय’चा घोष करीत भक्तगणांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तिसºया दिवशी मानाचे सातही नंदीध्वज रात्री ९ पर्यंत होम मैदानावर आले तर तोही विधी वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा रेवणसिद्ध बनशेट्टी यांनी व्यक्त केली.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने बुधवारी सकाळी मंदिरात मानकरी, नंदीध्वजांचे मास्तर, नंदीध्वजधारक आणि भक्तगणांची बैठक बोलावली होती. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील-बिराजदार, यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे, पंच कमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, सोमशेखर देशमुख, मल्लिकार्जुन कळके, काशिनाथ दर्गोपाटील, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, प्रा. राजशेखर येळीकर, चिदानंद वनारोटे, बाबुराव नष्टे आदी उपस्थित होते.
देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी प्रास्ताविक केले. गेल्यावर्षी ‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारातून प्रकाशमय यात्रा साजरी झाली. यंदाही या दोन घटकांनी प्रकाशमय यात्रेबरोबर दीपोत्सव-२०२० चे आयोजन केले आहे. दीपोत्सवात भक्तगणांनी सहभागी होण्याचे आवाहन भोगडे यांनी केले.
यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले, चिदानंद वनारोटे, क्षिरानंद शेटे, सिद्धय्या स्वामी यांनी आपले विचार मांडले. यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे यांनी आभार मानले.
यावेळी माजी नगरसेवक मल्लेश कावळे, केदार उंबरजे, नागफणा नंदीध्वज पेलणारे सोमनाथ मेंगाणे, सिद्धय्या स्वामी, सुदेश देशमुख, जनता सहकारी बँकेचे संचालक महेश अंदेली, चिदानंद मुस्तारे, सकलेश बाभुळगावकर, सोमनाथ मेंडके, योगीनाथ कुर्ले, शिवानंद कोनापुरे, हिरेहब्बू परिवारातील सदस्य, सिद्धेश थोबडे, कुमार शिरसी यांच्यासह सातही नंदीध्वजांचे मानकरी, मास्तर, नंदीध्वजधारक आणि भक्तगण उपस्थित होते.
दारुकामाबरोबर ‘लेसर शो’चाही विचार
- यात्रेच्या निमित्ताने शोभेचे दारूकाम हा सोहळा साजरा होतो. लाखो भाविक या सोहळ्यास हजेरी लावतात. या सोहळ्याला कुठे धक्का न लावता आणि प्रदूषणाचा विचार करता या सोहळ्यात लेसर शो दाखवण्याचा विचार आहे. कदाचित प्रायोगिक तत्त्वावर तो शो सादर करण्याचा आपला विचार आहे, असे धर्मराज काडादी यांनी सांगितले. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा फारसा इतिहास आणि त्यांचे कार्य पुढे आलेले नाही. या कामासाठी संशोधक पुढे आल्यास पंच कमिटी त्यांना नक्कीच सहकार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अष्टविनायकास चांदीचा लेप- धर्मराज काडादी
- सोलापूर शहरावर कुठलेच नैसर्गिक संकट येऊ नये यासाठी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत अष्टविनायकांची प्रतिष्ठापना केली होती. या अष्टविनायकांच्या पूजनाने यात्रेस प्रारंभ होतो. सुवर्ण सिद्धेश्वरच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायकांनाही चांदीचा लेप आणि तेथील परिसर सुशोभीकरण करण्याचा विचार पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला. बाहेरुन आलेल्या मान्यवर भक्तगणांना अक्षता सोहळा पाहता यावा यासाठी सम्मती कट्ट्यासमोर उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये स्थानिकांनी जागा अडवू नये. आपण स्वत: खाली मोकळ्या जागेत बसलात तर पाहुण्यांना अक्षता सोहळ्याचा आनंद लुटता येईल.
सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचा कौतुक सोहळा- मुस्तारे
- यात्रा यशस्वी करण्यामागे अनेक घटक असतात. महापालिका, पोलीस आयुक्त, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्या मोठ्या योगदानामुळेच यात्रा यशस्वी होते. योगदान दिलेल्या अधिकारी, कर्मचाºयांबरोबर सफाई कामगारांचा सन्मान श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते. याशिवाय उत्कृष्ट वार्तांकन अन् छायाचित्रे काढणाºयांसाठी स्पर्धा घेऊन रोख बक्षिसे देण्याची परंपरा यंदा दुसºया वर्षीही सुरु ठेवणार असल्याचे फाउंडेशनचे आनंद मुस्तारे यांनी सांगितले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी अथवा यात्रा समितीस महापालिकेकडून मुळीच सहकार्य मिळत नाही. पूर्वी असे होत नव्हते. पूर्वीच्या जुन्या जानकार मंडळींचा एक धाक होता. त्यामुळेच महापालिकेचे सहजपणे सहकार्य मिळत होते. महापालिका प्रशासनाने यात्रा होईपर्यंत पंच कमिटी आणि यात्रा समितीला सहकार्य केलेच पाहिजे. यात्रा कुण्या एकट्याची नाही तर ती तमाम सोलापूरकरांची आहे, हे महापालिकेने ध्यानात घेतले पाहिजे.
-विश्वनाथ चाकोते, माजी आमदार
वडिलांचे दु:ख दूर ठेवून यात्रेतील विधी वेळेतच- राजशेखर हिरेहब्बू
- गेली अनेक वर्षे यात्रेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे माझे वडील शिवानंद हिरेहब्बू यांचे आॅगस्टमध्ये निधन झाले. केवळ त्यांच्यामुळेच यात्रेतील खाचखळगे मला समजले. यात्रेतील बारकाव्यांचा अभ्यास करण्याचे धडेही त्यांनी दिले. आज ते आपल्यात नाहीत. वडिलांच्या जाण्याचे दु:खही आहे; मात्र ते दु:ख बाजूला ठेवून यात्रेतील चार प्रमुख विधी वेळेत आटोपणार असल्याचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले. यात्रा काय असते, चार दिवस आमच्यावर काय तणाव असतो, हे आम्हालाच माहीत असते. काही भक्तगण यात्रेचा सोयीस्कर अर्थ काढतात, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लोकमत’च्या भूमिकेचे कौतुक
- शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिराबरोबर सोलापूरचे ब्रॅडिंग व्हावे यासाठी गेल्या वर्षी ‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारातून प्रकाशमय यात्रा यशस्वी झाली. यंदा केवळ नंदीध्वज मार्गच नव्हे तर संपूर्ण शहर प्रकाशमय करण्याबरोबर मंदिर अन् तलाव परिसरात १० ते १२ जानेवारीपर्यंत लक्ष दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय ‘लोकमत’च्या माध्यमातून सात प्रमुख संघटनांनी घेतला आहे. पंच कमिटीच्या बैठकीत प्रकाशमय यात्रा अन् लक्ष दीपोत्सवाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करताना ‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत केले.