आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जा, यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:59 PM2018-03-06T17:59:04+5:302018-03-06T17:59:04+5:30
लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी
डी. एस. गायकवाड
टेंभुर्णी : लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी. डॉक्टर, इंजिनिअरचा मार्ग सोडून कला शाखेतील पदवी घ्या आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन पुणे येथील यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांनी केले.
टेंभुर्णी येथे ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विक्रीकर निरीक्षक सुप्रिया भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, मंत्रालयाचे सहायक कक्षाधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते, सोमेश्वर नवले, सुरेखा नानेकर, अश्विनी नाळे, सतीश कटोरे, उमेश देवकते, नरेंद्र शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रावसाहेब देशमुख, सागर देशमुख, बाळासाहेब बारवे, विलास देशमुख उपस्थित होते.
प्रश्न - स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे?
पाटील- तुमच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे. त्यानंतर तुमचे ध्येय निश्चित असले पाहिजे. एकदा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करण्याचे निश्चित झाल्यानंतर दहावी-बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश लवकर मिळू शकते.
प्रश्न- कोणत्या शाखेतील पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा द्यावी?
पाटील- लोकसेवा किंवा राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करायचे निश्चित असेल तर डॉक्टर, इंजिनिअर होण्यापेक्षा सरळ कला शाखेतील मराठी, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप वेळ मिळतो.
प्रश्न-शिक्षणाचे माध्यम कोणते असावे?
पाटील- कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी स्पर्धा परीक्षा कोणत्याही माध्यमातून दिली तरी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.
प्रश्न- अनेक विद्यार्थी सहा-सातवेळा स्पर्धा परीक्षा देऊनही त्यांना यश मिळत नाही, अशावेळी काय करावे ?
पाटील- पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे. एवढे असूनही यश मिळाले नाही तर निराश न होता आपला बी प्लॅन तयार पाहिजे.
प्रश्न-ग्रामीण विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींवर कशी मात करावी?
पाटील- ध्येय निश्चित असेल तर या अडचणीवर मात करणे शक्य आहे. राज्यात दोनशे ते अडीचशे आमदार आहेत. प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील गुणवत्ता असलेले पाच विद्यार्थी दत्तक घेतले तर १ हजार ४०० ते १ हजार ५०० विद्यार्थ्यांची सोय होईल, यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.