आचारसंहितेबाबत संभ्रम

By admin | Published: May 23, 2014 01:00 AM2014-05-23T01:00:06+5:302014-05-23T01:00:06+5:30

जि. प. बदली प्रक्रिया स्थगित : आदेश नसल्याचे स्पष्ट

The confusion about the Code of Conduct | आचारसंहितेबाबत संभ्रम

आचारसंहितेबाबत संभ्रम

Next

सोलापूर: शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता पुढे असली तरी प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार ठप्प होण्याची चिन्हे असतानाच आचारसंहितेचे स्पष्ट आदेश नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामपंचायतीच्या (ग्रामसेवक वगळता), आरोग्य तसेच बुधवारी पशुसंवर्धन व कृषी खात्याच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. बुधवारी निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी आचारसंहिता सुरू झाल्याचे जाहीर केले. याशिवाय लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शिक्षक-पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे मोरे यांनी सांगितले. ही बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्यांनी कर्मचारी बदल्यांची प्रक्रिया तत्काळ स्थगित करुन सचिवांचे मार्गदर्शन मागितले आहे. इकडे जिल्हाधिकारी कार्यालयही आचारसंहितेबाबत संदिग्ध आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शिक्षक व पदवीधरांबाबत प्रलोभन दाखविणारे निर्णय घेता येणार नाही, परंतु अन्य निर्णय घेण्याची अडचण नाही, असे स्पष्ट केले.

--------------------------

आचारसंहितेचा प्रशासनाकडून बाऊ मागील वर्षी कसलीही आचारसंहिता नसताना व स्वत:च्या उत्पन्नाचा निधी (सेस) खर्च करण्यासाठी अडचण नसतानाही जिल्हा परिषदेने सेसचा अवघा ५६.५६ टक्के खर्च केला आहे. वर्षभरात जि. प. पदाधिकारी व प्रशासनाला स्वत:च्या उत्पन्नातून जनतेसाठी योजनाही राबविता आल्या नाहीत. ही शरमेची बाब असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बाऊ केला जात आहे.

-------------------------

कर्मचारी बदली प्रक्रिया थांबविण्यात आली असून, पदवीधर व शिक्षकांच्या बदल्या रद्दच होतील. अन्य संवर्गाच्या बदल्या करण्याबाबत सचिवांचे मार्गदर्शन मागितले आहे. निवडणूक आयोगाच्या धोरणात्मक आदेशाचे पालन केले जाईल. स्थायी व सर्वसाधारण सभाही होईल. - श्वेता सिंघल सीईओ, जि. प.

---------------------------- अंशत: आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या त्रोटक सूचना असल्याचे आयोगाच्या निर्णयाची आम्हीही वाट पाहत आहोत. २६ मे रोजी आयोजित केलेली जिल्हा नियोजनची बैठकही होईल. पदाधिकार्‍यांच्या गाड्या ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या नाहीत. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी

Web Title: The confusion about the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.