माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 04:23 PM2024-10-19T16:23:48+5:302024-10-19T16:25:45+5:30

बबन शिंदे यांच्याकडून मुलासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी मोडून काढण्यासाठी माढ्यातील इतर चार इच्छुकांनी आज शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

Confusion over ncp sp candidate in Madha What happened after the four aspirants reached Sharad Pawars meeting | माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

Madha Assembly Constituency ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य दिल्याने या तालुक्यातून विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी शरद पवार यांच्याकडे इच्छुकांची रांग लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी यंदा स्वत: निवडणुकीतून माघार घेत मुलगा रणजीत शिंदे यांना पुढे केलं असून मुलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे, माढ्यातून पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी अन्य इच्छुकांचीही मोठी गर्दी झाली आहे. मात्र शिंदे यांच्याकडून मुलासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी मोडून काढण्यासाठी माढ्यातील इतर चार इच्छुकांनी आज शरद पवार यांची मुंबईत भेट घेत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, मात्र पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना दूर ठेवा, अशी भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी आज अभिजीत पाटील यांच्यासह संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील अशा चौघांनी शरद पवारांची भेट घेतली. "आम्ही सर्व इच्छुक भेटल्यानंतर रणजीत शिंदे यांना आपण उमेदवारी देणार नसल्याचं शरद पवारांनी आम्हाला आश्वास्त केलं आहे," अशी माहिती या इच्छुकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू रणजीतसिंह मोहिते पाटील हेदेखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर अभिजीत पाटील यांनी म्हटलं की, "आमची सातत्याने धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी चर्चा होत आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील कोणीही अद्याप विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवलेली नाही."

रणजीतसिंह मोहितेंकडून गुपचूप पवारांच्या भेटीचा प्रयत्न

भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसरात आले होते. मात्र तिथे माध्यमांचे कॅमेरा पाहताच कारमध्ये मास्क घालून बसलेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करत चालकाला तिथून गाडी काढण्यास सांगितले आणि ते निघून गेले. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी आज ते पवार यांना भेटण्यास जात होते, असे समजते.

Web Title: Confusion over ncp sp candidate in Madha What happened after the four aspirants reached Sharad Pawars meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.