coronavirus; घरातल्या मंडळींनी मोबाईल बाजूला ठेवून कॅरमवरची धूळ झटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:37 AM2020-03-22T10:37:50+5:302020-03-22T10:39:54+5:30
‘ते’ सध्या काय करताहेत ?; ‘लोकमत’ आजपासून रोज एका फॅमिलीसोबत...
प्रभू पुजारी
सोलापूर : सध्या अनेकांच्या घरात ना उत्सव, ना कोणता घरगुती कार्यक्रम, पण तरीही घरोघरी उत्साहाला उधाण आल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई-वडिलांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश निघाला तर दुसरीकडे मुलांच्या शाळांना सुटी मिळाली़ त्यामुळे सध्या प्रत्येकाच्या घराचं गोकुळ झालं असून, घर आनंदानं न्हाल्याचं चित्र आहे.
सध्या अनेकांच्या घरातील एक किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य नोकरीला किंवा उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने सकाळी-सकाळीच बाहेर पडतात़ मुलांची शाळा, क्लासेस व अन्य कलाप्रकार शिकण्यासाठी सतत बाहेरच असतात़ परिणामी प्रत्येकाच्या घरातील संवाद हरवत चाललेला आहे़ थोडक्यात काय तर कामाच्या व्यापामुळे जीवनशैली बदलली आहे़ त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचा अर्थ कळूनही वेळेअभावी घरात संवाद नावाचा बोलका चेहरा गळून पडताना दिसतो. कुणी-कुणाला वेळ द्यायला तयार नाही. अगदी तोलूनमापून बोलणे़ काही काही घरात संचारबंदी असल्यासारखी माणसं वावरताना दिसतात.
ज्येष्ठांना त्यांचे अनुभव शेअर करायचे असतात, नातवंडांना त्यांच्या आई-वडिलांच्या बालपणीच्या आठवणी, खोड्या आणि दंगामस्तीचे काही क्षण जिवंत करून सांगायचे असतात, पण मुलांवर शाळेच्या अभ्यासाचे ओझे, खासगी शिकवणीची प्रतिष्ठा लादलेली असते. त्यामुळे तेसुद्धा आजी-आजोबांना टाळतात. कामाचा व्याप, मानसिक ताणतणाव, व्यवसायातील चढ-उतार किंवा जगासोबत धावण्याची लावून घेतलेली स्पर्धा अशा अनेक कारणांनी घरातला संवाद थांबल्याने भिंतीही अबोल झाल्यासारखे चित्र आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या भीतीने शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत़ बच्चे कंपनींच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत़ नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश दिला आहे़ त्यामुळे बच्चेकंपनी, रोज कामाला जाणारे आई-बाबा व इतर मंडळी घरातच आहेत़ त्यामुळे बच्चे कंपनीला आईबाबांचा निरंतर सहवास लाभत आहे़ आपलाही वेळ आनंदात जावा म्हणून घरातील मोठी मंडळी लहान मुलांसोबत कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, पत्ते, सापसिडी आदीप्रकारच्या बैठे खेळात रममाण होत आहेत़ परिणामी अनेकांनी काही काळ का होईना मोबाईलला अलिप्त ठेवल्याचे चित्र घराघरांतून पाहायला मिळत आहे.
मी शिक्षक आहे़ सकाळची शाळा असल्याने लवकरच जावे लागते़ परत घरी जेव्हा येतो, तेव्हा मुले शाळेला गेलेली असतात़ त्यामुळे आमच्यात फारसा संवाद होत नाही़ सध्या मुलांसोबत वेळ घालवत असल्यामुळे आनंद वाटत आहे़
- नागेश होसुरे, शिक्षक
कित्येक दिवसांनी इतका वेळ आई-बाबांसोबत संपूर्ण दिवस घालवत आहे़ दिवसभर विविध खेळ खेळण्यात व्यस्त असून, गाण्यांच्या भेंड्याही खेळत आहे़ एकूण घरात खूप आनंदी वातावरण आहे़
- शशांक कणमुसे, विद्यार्थी