पंढरपुरातील रस्त्यांची दुरूस्ती, निकृष्ट कामांची चौकशीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन
By Appasaheb.patil | Published: August 23, 2023 03:09 PM2023-08-23T15:09:46+5:302023-08-23T15:10:06+5:30
प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार कोळी यांनी कॉंग्रेसचे निवेदन स्वीकारले.
पंढरपूर : पंढरपूर शहरात नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी व आषाढी यात्रा कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेसमोर टाळ वाजवून भजन म्हणून अनोखे आंदोलन केले. यानंतर प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार कोळी यांनी कॉंग्रेसचे निवेदन स्वीकारले.
यावेळी सुहास भाळवणकर, संदिप शिंदे, सागर कदम, पुरूषोत्तम देशमुख, मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल, शिवकुमार भावलेकर, भाऊ तेलंग, संतोष हाके, मधुकर फलटणकर, सोमनाथ आरे, सुनिल उत्पात, शामराव साळुंखे, मयूर भुजंगे, महेश अधटराव, मल्हारी फाळके, प्रकाश साठे, समाधान पोळ,राहुल गवळी, किशोर जाधव, सागर पोरे, सागर लोखंडे, राज वाघमारे, नंदू आगावणे, आदित्य शेटे, सुनिल क्षिरसागर आदी उपस्थित होते.
पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी म्हणाले की, शहरातील नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा निधी दिला जातो पण त्या पैशातून योग्य कामे केली नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरून येते. आंदोलनाची दखल घेवून रस्त्यांची कामे त्वरित चांगल्या दर्जाची करण्यात यावी व आषाढी यात्रा कालावधीत रस्ते केलेल्या ठेकेदारांवर कारवाई न केल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ही शहराध्यक्ष सुर्यवंशी दिलेला आहे.