काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना !

By Admin | Published: June 10, 2014 12:39 AM2014-06-10T00:39:39+5:302014-06-10T00:39:39+5:30

पराभवाची अस्वस्थता : आधीच्या इच्छुकांची लोकसभेनंतर नकार घंटा

Congress gets a district president! | काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना !

काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळेना !

googlenewsNext

सोलापूर : बुडत्या जहाजात बसण्याचे धाडस कोण करणार? नेमकी हीच स्थिती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची झाली आहे़ रिक्त झालेल्या अध्यक्षपदी बसण्यासाठी इच्छुकांनी नकार दिल्याने ही माळ कोणाच्या गळ्यात टाकायची? असा प्रश्न श्रेष्ठींसमोर निर्माण झाला आहे़
लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला़ या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी पदाचा राजीनामा दिला़ मुंबई येथे झालेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या चिंतन बैठकीत जिल्हाध्यक्ष शेळके आणि शहराध्यक्ष धर्मा भोसले या दोघांचेही राजीनामे नामंजूर करण्यात आले़ त्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आदेश दिले गेले़ ३ जून रोजी मात्र पुन्हा श्रेष्ठींकडून निरोप आला़ शेळके आणि भोसले या दोघांचेही राजीनामे मागवून मंजूर करण्यात आले़ शहराध्यक्षपदाची धुरा तातडीने प्रकाश यलगुलवार यांच्याकडे सोपविण्यात आली़ जिल्हाध्यक्षपद मात्र अद्यापही रिक्तच आहे़
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी कल्याणराव काळे, प्रकाश पाटील (तुंगत) यांच्यासह अनेक जण इच्छुक होते़ पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर इच्छुकांचा इरादा बदलला़ शेळके यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाच्या नावाची चर्चा सुरू झाली़ त्यात प्रकाश पाटील, कल्याणराव काळे, अ‍ॅड़ रामहरी रुपनवर, सिद्धाराम म्हेत्रे यांची नावे आघाडीवर होती़ अ‍ॅड़ रुपनवर यांनी विधानपरिषदेसाठी फिल्डिंग लावल्याने अध्यक्षपदाकडे साफ दुर्लक्ष केले होते़
प्रकाश पाटील यांचे नाव नक्की करून शेळके यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा होती़ आता प्रकाश पाटील यांनीही अध्यक्षपदापासून दूर राहण्याचे ठरविले आहे़ पक्षाने पद दिले तरी आपण स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी आता घेतली आहे़ प्रकाश पाटील हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील असल्याने तसेच मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील मराठा समाजाला काँग्रेसच्या छत्राखाली आणण्यासाठी त्यांचा नावाचा विचार करण्यात आला होता़ आता त्यांनीच भूमिका बदलल्याने श्रेष्ठी पेचात पडली आहे़
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचा भार समर्थपणे पेलला होता़ आक्रमक नेतृत्व, आर्थिक कुवत, कार्यकर्त्यांचा संच या बाबींमुळे पुन्हा एकदा म्हेत्रे यांच्याकडेच जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात येतील, अशी चर्चा आहे़ त्यांनीही सद्यस्थितीत अध्यक्षपद नको रे बाबा़़़ अशी सावध भूमिका घेतली आहे़ त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची रिकामी आहे़
--------------
२० जूनपर्यंत प्रतीक्षा
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या विदेशात आहेत़ येत्या १८ जून रोजी ते भारतात परतत आहेत़ त्यानंतर २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत़ तोपर्यंत नव्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार नाही़ शेळके यांचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांनीही काँग्रेस कमिटीत जाणे टाळले आहे़ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कार्यालयात सन्नाटा पसरला असून, नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी कार्यकर्त्यांना २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे़
---------------------------
मी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे़ त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही़ जे पुरेसा वेळ देऊ शकतात अशांना पद देण्यास हरकत नाही़ तूर्तास माझी इच्छा नाही़
- सिद्धाराम म्हेत्रे
माजी गृहराज्यमंत्री
------------------------------
जिल्हाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे़ मला याबाबत विचारणाही झाली़ परंतु त्यात मला स्वारस्य नाही़ मी माझा नकार श्रेष्ठींना कळविला आहे़ वेळ देणाऱ्याचीच जिल्हाध्यक्षपदासाठी निवड व्हावी.
- प्रकाश पाटील
तुंगत

Web Title: Congress gets a district president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.